कोरोना काळातही घरपट्टी भरणा करून मालमत्ताधारकांनी जबाबदारी पार पाडली
प्रतिनिधी/ बेळगाव
यंदा कोरोनामुळे लॉकडाऊन असतानादेखील शहरातील मालमत्ताधारकांनी घरपट्टी भरणा करून आपली जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे महापालिकेच्या खजिन्यात आतापर्यंत 28 कोटी 21 लाखाचा महसूल जमा झाला आहे. आठ महिन्यांच्या कालावधीत उद्दिष्टापैकी 62 टक्के घरपट्टी जमा झाली आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी थकबाकीदाराची यादी तयार करून वसुली मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापालिकेने 2020-21 या अर्थिक वर्षात 45 कोटी घरपट्टी जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी आतापर्यंत 28 कोटी घरपट्टी जमा झाली आहे. मालमत्ता कर वसुलीकरिता महापालिकेला चलन देऊन वसुली मोहीम राबवावी लागत होती. पण ऑनलाईन प्रक्रियेमुळे करभरणा करण्याची प्रक्रिया सोयीची झाली आहे. त्यामुळे आठ महिन्यांच्या कालावधीत मालमत्ताधारकांनी करभरणा केल्यामुळे घरपट्टी वसुलीचे 62 टक्के उदिष्ट पूर्ण झाले आहे. कोरोनाचा प्रसार झाल्याने शहरात तीन महिन्यांचा लॉकडॉऊन करण्यात आला होता. त्यामुळे पाच टक्के सवलतीसह घरपट्टी भरण्याची मुदत वाढवून देण्यात आली होती. याचा लाभ मालमत्ताधारकांना झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार आणि लॉकडॉऊन केल्यानंतरही मालमत्ताधारकांनी घरपट्टी जमा करून आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आहे.
यंदा 45 कोटी घरपट्टी जमा करण्याचे उद्दिष्ट असून यापैकी 28 कोटी जमा झाले आहेत. उर्वरित घरपट्टी जमा करण्यासाठी महापालिकेकडे चार महिन्यांचा कालावधी आहे. या कालावधीत उर्वरित घरपट्टी जमा करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. थकलेला मालमत्ता कर वसूल करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी दिला. तसेच जुने थकबाकीदार व आर्थिक वर्षाची घरपट्टी भरणा केली नसलेल्या मालमत्ताधारकांची यादी तयार करून त्यांना जप्तीची नोटीस बजावण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे. यामुळे महापालिकेच्या महसूल विभागाने मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल थकबाकीदारांना नोटीस बजावण्याची तयारी केली आहे. उद्दिष्टपूर्तीकरिता अद्याप सतरा कोटीची घरपट्टी वसूल करणे आवश्यक आहे. येत्या साडेतीन महिन्यात हे उद्दिष्ट पूर्ण करून यापेक्षा जास्त महसूल वसूल करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे. यामुळे महसूल निरीक्षक व वॉर्ड क्लार्क थकबाकीदारांचा शोध घेऊन नोटीस बजावण्याची तयारी करीत आहेत. घरपट्टीची 50 हजारहून अधिक रक्कम असलेल्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. महापालिका अधिकारी व कर्मचाऱयांच्या पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. सदर पथकाच्या माध्यमातून घरपट्टी वसुलीची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.