एमटीडीसी-एमसीएच्या सहभागातून उपक्रम, देशी-विदेशी पर्यटकांना सुवर्णसंधी
मुंबई/प्रतिनिधी
मुंबईत येणाऱया देश-विदेशातील पर्यटकांना आता क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्ण क्षणांचा साक्षीदार असलेल्या वानखेडे स्टेडियमची सफर करता येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा यांचे होम ग्राऊंड म्हणून वानखेडे स्टेडियमची ओळख आहे. 2011मध्ये भारतीय संघाने याच स्टेडियमवर श्रीलंकेला धूळ चारत विश्वचषक जिंकला होता.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला एमटीडीसीसोबत `वानखेडे स्टेडियम सफर’ या उपक्रमाचा प्रस्ताव दिला होता. मुंबई क्रिकेट असोसिएशनने हा प्रस्ताव स्वीकारला आहे. हा उपक्रम जगभरातील पर्यटक आणि क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी घेऊन येणार आहे. याआधी खासदार शरद पवार आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांच्यासोबत स्टेडियम सफर तसेच मुंबईतून बहरलेल्या क्रिकेटचे संग्रहालय बनवण्याबाबत चर्चा केली होती, यासाठी देखील एमसीए तयार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.