आधारकार्डच्या धर्तीवर अंमलबजावणी : सरकारी सुविधांसाठी बंधनकारक
बेळगाव : सरकारच्या सर्व सुविधा मिळविण्यासाठी आता प्रत्येक कुटुंबाला एकच ओळख क्रमांक (आयडी) मिळणार आहे. आधारकार्डप्रमाणेच हा आयडी क्रमांक असणार असून प्रत्येक व्यक्तीऐवजी प्रत्येक कुटुंबाला एक याप्रमाणे तो दिला जाणार आहे. केवळ आधार क्रमांक असेल तर पुरे असे म्हटले जाणाऱया याकाळात आणखी एक क्रमांक कशासाठी? असा प्रश्न सामान्य नागरिकांतून केला जात आहे.
राज्य सरकारच्या ई-प्रशासन केंद्राद्वारे हा उपक्रम राबविला जाणार आहे. कर्नाटकात वास्तव्य करीत असलेले रहिवासी हा कुटुंब आयडी घेण्यास पात्र आहेत. सरकारी सेवा किंवा सुविधा घेण्यास सर्व कागदपत्रे घेऊन जाण्याची गरज नाही. कुटुंब आयडी सांगितल्यास पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
सध्या रेशनकार्ड असणाऱयांना कुटुंब ओळख क्रमांक (आयडी) क्रिएट झाला आहे. हा क्रमांक जाणून घेण्यासाठी ‘कुटुंब’ वेबसाईटवर जावे लागेल किंवा सर्व नागरी सेवा केंद्रात (सीएससी) याबाबत विनाशुल्क माहिती पुरविली जाते. रेशनकार्ड नसणाऱयांनाही हा क्रमांक अगदी सुलभपणे मिळविता येतो. सर्व नागरी सेवा केंद्रांमध्ये (कर्नाटक वन, बेळगाव वन) येथेही मिळविता येतो. रेशनकार्डमध्ये असलेल्या माहितीच्या आधारे हा क्रमांक तयार केला जातो.
आयडी मिळवायचा कसा?
कुटुंब आयडी मिळविणे सोपे आहे. www.kutumb.karnataka.gov.in वेबसाईटला भेट देऊन आपल्या कुटुंबातील सदस्यांचा तपशील देऊन माहिती अपलोड करावी. संपर्क साधता येऊ शकेल, अशा एकाच कर्त्या व्यक्तीला नॉमिनी केल्यास कुटुंब आयडी मिळतो. नागरी सेवा केंद्रामध्येही तो सुलभपणे उपलब्ध करून दिला जातो.
आयडीचा लाभ सर्वव्यापी
सर्व सरकारी सेवा हा कुटुंब आयडी सांगून मिळविता येतील. जन्म-मृत्यू नोंदणी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या विविध सेवा, सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ, घरकुल योजना, शिष्यवृत्ती, कृषी सुविधा, वाहन नोंदणी, वाहन परवाना आदी सुविधा मिळविता येणार आहेत.
नुतनीकरणालाही वाव
एका कुटुंबाला एकच आयडी असतो. मुलीचा विवाह होऊन दुसरीकडे जाणे, सून घरी येणे, जन्म-मृत्यू, विभक्त आदी कारणांमुळे या क्रमांकात दुरुस्ती किंवा नुतनीकरण वा अद्ययावत करण्याचा या योजनेत वाव आहे.