व्हिडिओ कॉलद्वारे अनेकांना फशी पाडण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी/ बेळगाव
‘मी केबीसीमधून बोलतो, तुमचे नशीब उजळले आहे. तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागली आहे. मात्र यासाठी तुम्ही प्रथम 10 हजार रुपये पाठवा’, असे व्हिडिओ कॉलद्वारे अनेकांना संपर्क साधून फसवणूक करण्याचा नवा फंडा सुरू झाला आहे. अनगोळ येथील एकाला अशाच प्रकारे फसविण्यासाठी प्रयत्न झाला. मात्र सदर व्यक्तीच्या सावधगिरीमुळे भामटय़ांचा डाव फसला. अशा व्हिडिओ कॉल्सना कोणीही फशी पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओ कॉलद्वारे बोलताना नव्याने तयार करण्यात आलेली बोगस कागदपत्रे तसेच अनेकांचे तयार केलेले व्हिडिओदेखील पाठविले जात आहेत. यावेळी त्यामध्ये अमिताभ बच्चन व इतरांचे धन्यवाददेखील मानले आहेत. ‘तुमचा लॉटरीचा धनादेश तयार आहे. त्यावर सर्व स्वाक्षरी झाल्या आहेत. हा धनादेश तुम्हाला पाठवायचा आहे. तेव्हा तुम्ही प्रथम 10 हजार पाठवा’, असे सांगितले जात आहे.
अनगोळ येथील यशवंत मुचंडी यांना अशाच प्रकारे व्हिडिओ कॉल आला. त्या कॉलमध्ये समोरील व्यक्ती अत्यंत विश्वासाने बोलत होती. सर्व कागदपत्रे दाखविली जात होती. अनेकांचे व्हिडिओदेखील त्यांना पाठविण्यात आले. जणू हुबेहूब केबीसीमधूनच बोलत असल्याचे त्या भामटय़ांनी भासविले. त्यामुळे कोणीही सहजासहजी फसू शकते. मात्र यशवंत मुचंडी यांनी सतर्कता बाळगल्यामुळे ते फसले नाहीत. मात्र अशा प्रकारे अनेकांना व्हिडिओ कॉल येऊ शकतात. तेव्हा कोणीही त्याला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.