गोडोली/ प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता धरून प्रशासनाने योग्य उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. गावातील साथरोग प्रतिबंधक उपाय करणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दि.१० जून रोजीच्या आदेशानुसार नव्याने गठीत ग्रामस्तरीय समितीत आता प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.या समितीच्या माध्यमातून तिसरी लाट रोखण्यासाठी गुरुजी आणि सरांचे योगदान मिळणार असल्याने त्यांची भूमिका महत्त्वापुर्ण ठरणार आहे.
या समितीचे अध्यक्ष सरपंच आणि सहअध्यक्ष म्हणून तलाटी तर सचिव म्हणून ग्रामसेवक जबाबदारी पार पाडणार आहेत. यातस्थानिक विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक, बचतगटाच्या ग्रामसंघ अध्यक्षा, महिला बचतगट सचिव, पोलीस पाटील,ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, प्राथमिक शिक्षक, अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी,स्वयंसेवक हि मंडळी या समितीचे सदस्य असणार असून ते समितीवर सोपवलेली जबाबदारी पार पाडणार आहेत.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने निश्चित करण्यात आलेल्या प्रतिबंधत्मक उपाययोजना, नियमावलीची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी गांव पातळीवरील यंत्रणेतून ग्रामस्तरीय समिती गठीत करुन कामकाज पार पाडणार आहे.
जिल्हयामध्ये परराज्यातून, परजिल्हयातून येणारे नागरिकांचेमुळे तसेच जिल्हयातील वाढत्या कोरोना संक्रमणाचे प्रमाण पाहता, प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढ होऊ नये, या करीता कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. तसेच सद्यस्थितीत शासनाचे वरिष्ठ पातळीवरुन आणि टास्कफोर्स यांचे अनुमानानुसार देशात संभाव्य तिसरी लाट येण्याची दाट शक्यता वर्तविली आहे. संभाव्य लाटेमध्ये लहान मुलांना जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असलेने, जिल्हयातील संभाव्य तिस-या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी हि समिती कार्यरत असणार आहे.
नव्याने गठीत केलेल्या ग्रामस्तरीय समितीने आत्तापर्यंत शासनाने आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये देणेत आलेल्या जबाबदा-या अचूक पार पाडणेच्या आहेत. संबंधीत शिक्षकांनी त्यांचे मुख्यालयी पूर्णवेळ उपस्थित राहणे बंधनकारक आहे. समितीस नेमून दिलेल्या कामकाजामध्ये कुचराई अगर कसूर झाल्यास संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथ रोग अधिनियमातील तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार होणार आहे.