हनुमाननगर परिसरातील दुभाजकावरील झाडाची कत्तल
प्रतिनिधी/ बेळगाव
शहर परिसरात चोरी, घरफोडय़ांवरच नव्हे तर घरात घुसून महिलांचा गळा दाबून दरोडा टाकण्यापर्यंत मजल मारली आहे. परिणामी या घटना ताज्या असतानाच आता चोरटय़ांनी चंदनाची झाडेही लक्ष्य बनविली आहेत. त्यामुळे अनेकांतून संताप व्यक्त होत आहे.
मंगळवारी पहाटे हनुमाननगर येथील एक झाड चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुभाजकामध्ये लावण्यात आलेल्या चंदनाच्या झाडाची चोरी केली आहे. चंदनाचे झाड वनखात्याच्या परवानगीशिवाय तोडता येत नाही. त्याची मालकी प्रथम सिद्ध करावी लागते. ही झाडे तर सरकारच्या मालकीची आहेत. मात्र तेच कापण्याचे धाडस चोरटय़ांनी दाखविले आहे.
यापूर्वीही येथील झाडांची बिनबोबाट कत्तल करून पळविण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे चंदनाच्या झाडांची तस्करी करणारी टोळीच सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातही असे प्रकार घडले आहेत. अगसगा व कडोली परिसरात चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे काबाडकष्ट करून शेतकऱयांनी झाडे लावली. मात्र चोरटय़ांनी ती पळविल्याने त्यांचे श्रम वाया गेले आहेत.
मंगळवारी तर दुभाजकावर लावण्यात आलेले चंदनाचे झाड चोरण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान चोऱया, घरफोडय़ा व दरोडय़ासारखे प्रकार घडत असताना पोलीस मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बेळगावकर किती सुरक्षित? हा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता चंदनाची झाडेही चोरटे लक्ष्य बनवित आहेत. त्यामुळे चंदन तस्करी करणाऱया टोळीच्या मुसक्मया आवळण्याची गरज निर्माण झाली आहे.