कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डी-मार्टचा निर्णय
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रत्नागिरीतील डी-मार्ट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी तर डी-मार्टबाहेर जिल्हय़ाबाहेरील पासिंगच्या गाडय़ा खरेदीसाठी आल्या होत्या. याची माहिती मिळताच खबरदारी म्हणून डी-मार्ट बंद ठेवण्यात आले आहे. केवळ घरपोच सेवा पुरवण्यात येणार असल्याचा फलक डी-मार्टच्या गेटजवळ लावण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्हय़ात प्रशासनाने चाकरमान्यांना येण्यास परवानगी देण्यास सुरूवात केली आणि जवळपास मुंबईतून आलेले 28 चाकरमानी पॉझिटीव्ह निघाले. अजूनही रिपोर्ट येत आहेत. प्रशासनाची परवानगी घेवून चाकरमानी मिळेल त्या गाडय़ा घेवून रत्नागिरीत दाखल होत आहेत. त्यानंतर खरेदीसाठी डी-मार्टला गर्दी होत असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी जिल्हय़ाबाहेरील पासिंगच्या गाडय़ा डी-मार्टच्या बाहेर दिसू लागल्याने रत्नागिरीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून डी-मार्ट बंद ठेवण्यात आले आहे.