कोकण विभागात 14 जुलैपासून अंमलबजावणी : सावंतवाडीतील पाच गावांची प्रायोगिक तत्वावर निवड
संतोष सावंत / सावंतवाडी:
कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्हय़ांतील शासकीय गावठण जमिनींचे सर्व्हेक्षण आता ड्रोन कॅमेऱयाद्वारे होणार आहे. येत्या 14 जुलैपासून कोकण विभागात प्रथमच ड्रोन कॅमेऱयाने सर्व्हेक्षण भूमी अभिलेख विभाग करणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील सात गावांची ड्रोन कॅमेऱयाने सर्व्हेक्षण करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. डेहराडून येथील सर्व्हेक्षण विभागाची टीम कोकण विभागात सर्व्हेक्षणासाठी येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर प्रथम पाच गावांतील सुमारे वीस हेक्टर जमिनीचे ड्रोन कॅमेऱयाने सर्व्हेक्षण केले जाणार आहे.
जुन्या पद्धतीने जमिनीच्या मोजणीमध्ये सर्व्हेअर गावात येऊन मोजमाप करून सर्व्हेक्षण करतात. या प्रक्रियेस खूप वेळ जातो. ड्रोन कॅमेऱयाद्वारे जमिनीचे सर्व्हेक्षण व मोजणी करण्याची नवी प्रणाली राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने हाती घेतली आहे. त्याचा पहिला प्रयोग गावातील शासकीय गावठाण जमिनींपासून करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार कोकण विभागात एकाच वेळी 14 जुलैपासून ड्रोन कॅमेऱयाने जमिनीचे सर्व्हेक्षण, मोजणी हाती घेण्यात येणार आहे. सावंतवाडी तालुक्यात गावठाण जमिनी मोठय़ा प्रमाणात आहेत. परंतु खाजण गावठणपेक्षा शासकीय गावठण जमिनीचे प्रथम सर्व्हेक्षण व मोजणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये सात गावे असून चौकुळ, मसुरे, केगद, गेळे, नेने, कलंबिस्त, फणसवडे या गावांचा समावेश आहे. सातही गावात जवळपास वीस हेक्टरहून अधिक जमीन गावठाण आहे. यामध्ये चौकुळ – 10 हेक्टर 7 गुंठे, गेळे – 2 हेक्टर 43 गुंठे, मासुरे – 6 हेक्टर 23 गुंठे, नेने – 1 हेक्टर 74 गुंठे, कलंबिस्त – 76 गुंठे, फणसवडे – 1.62 हेक्टर अशा जमिनी शासकीय गावठाण आहेत. या जमिनींचे ड्रोन कॅमेऱयाने सर्व्हेक्षण होणार आहे. पहिल्या टप्प्यात कलंबिस्त व फणसवडे हे दोन गाव सोडून अन्य पाच गावांत सर्व्हेक्षण होणार आहे.
जमिनीच्या सर्व्हेक्षणासाठी अनेकवेळा पाठपुरावा
महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, नांदेड व शहरी भागात मोठय़ा प्रमाणात गावठाण जमिनी आहेत. कोकण विभागात शासकीय गावठाण जमिनी आहेत. या गावठाण जमिनींमध्ये वाडय़ा आहेत. घर, लागवड आदी क्षेत्र यामध्ये आहे. आतापर्यंत याच जमिनीमध्ये महाराष्ट्र शासनाचे नाव नोंद आहे. त्यामुळे वस्ती, वाडय़ा असलेल्या लोकांना आपल्या घराचा अथवा जमिनीचा असेसमेंट उतारा मिळत नाही. त्यामुळे त्यांना अनेक समस्या उद्भवत आहेत. सदर वस्ती असलेल्या ठिकाणी या जमिनीसंबंधित वस्ती घरधारकांच्या मालकीच्या व्हाव्यात, यासाठी या जमिनींचे सर्व्हेक्षण, मोजणी होणे आवश्यक होते. गेली कित्येक वर्षे याबाबत आंदोलने, मोर्चा, मंत्री महोदयांकडे पाठपुरावाही करण्यात आला. परंतु या जमिनीचा प्रश्न निकाली नव्हता. मात्र, आता या गावठाण जमिनीचे सर्व्हेक्षण, मोजणी करण्याच्यादृष्टीने राज्य सरकारने पावले उचलली आहेत.
भूमी अभिलेख, महसूल अधिकारी, कर्मचाऱयांना प्रशिक्षण
ड्रोन कॅमेऱयाने सर्व्हेक्षण, मोजणीबाबत जिल्हय़ातील भूमी अभिलेख व महसूल विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचाऱयांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी सर्व प्रक्रिया प्रशासनाने हाती घेतली आहे. जिल्हय़ातील डोंगराळ व दुर्गम भागातील परिस्थिती पाहता थेट भूमी अभिलेख निरीक्षक जाऊन मोजणी करणे कठीण होते. तसेच वेळही वाया जात होता. त्यात भूमी अभिलेखकडे सध्या मनुष्यबळ कमी आहे. अशा स्थितीत जमीन मोजणी व सर्व्हेक्षणाचे प्रस्ताव मोठय़ा प्रमाणात पडून आहेत. ते निकाली काढण्याच्या दृष्टीने आता नवीन प्रणाली फायदेशीर ठरणार आहे.
हा प्रयोग यशस्वी झाल्यावर यापुढे खासगी जमिनींची ड्रोन कॅमेऱयाने मोजणी व सर्व्हेक्षण होण्यास गती येणार आहे.
सावंतवाडी तालुका भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक प्रियदा साकोरे म्हणाल्या, प्रथम शासकीय गावठाण जमिनीमध्ये मोजणी व सर्व्हेक्षण होणार आहे. ड्रोन कॅमेऱयाने मोजणी व सर्व्हेक्षण झाल्यानंतर त्या भागाचे नकाशे आम्ही करणार आहोत. काही त्रुटी असल्यास तेथे जाऊन नकाशा तयार करणार आहोत. डिजिटल नकाशा बनवण्याची ही नवी प्रणाली आता अंमलात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात कॅमेऱयाने सर्वेक्षण होण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व्हेक्षण होणाऱया पाच गावांतील सरपंच व ग्रामस्थांनी मोजणी सर्व्हेक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
सावंतवाडी तालुक्यातील भूमी अभिलेख निरीक्षक भालचंद्र सावंत, संदीप सावंत, सचिन पराटे, हरिश्चंद्र गवस, विश्वास सावंत, नानचे आदी टीम या नव्या प्रणालीबाबत गावात जाऊन जनजागृती करीत आहे. आता गावठाण जमिनीबाबत मोजणी व सर्व्हेक्षण प्रणाली झाल्यानंतर लवकरच शासनाची सातबारावरील नोंदणी रद्द होऊन तेथे मालकी हक्काची नावे लागणे सोपे होणार आहे.
सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी घारपी, उंडली गाव चरण व देवस्थान जमिनीबाबतचे सर्व्हेक्षण व मोजणी ड्रोन कॅमेऱयाने करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट केले.