बुद्बिबळ स्पर्धेनंतर ऑनर्लाइन नेमबाजी स्पर्धेचे यशस्वी आयोजन, उत्तेजक प्रतिबंधक चाचणी देखील ऑनलाईन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोनामुळे जगभरातील सर्वच क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत तर काही रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे मैदानांवरील हस्तांदोलन, विजयी जल्लोष, चाहत्यांची अफाट गर्दी हे दृश्य किमान एक वर्ष तरी दिसणार नाही. मात्र त्यानंतरही कोरोनामुळे आलेले हे बदल कमी अधिक प्रमाणात दिसतच राहतील, यात शंकाच नाही.
संपूर्ण जगभरात लॉकडाऊनमय स्थिती आहे. जगभरातील क्रीडापटू आपल्याच घरी असल्याने त्यांना निरनिराळय़ा कल्पना सूचत असल्याचे पहायला मिळत आहे. खेळांमध्येही काही प्रमाणात बदल झाले आहेत. मागील काही वर्षापासून बुध्दिबळ ऑनलाईन खेळले जाते. पण, आता इतर खेळसुध्दा ऑनलाईन खेळले जाऊ लागले आहेत.
दोनच दिवसापूर्वी झुम ऍपद्वारे ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. झूम ऍपद्वारे खेळाडू आपल्या घरुनच यात सहभागी झाले आणि इंटरनेटवर ही स्पर्धा थेट प्रक्षेपित करण्यात आली. नेमबाजीच्या या पहिल्या ऑनलाईन स्पर्धेत भारताचे दिग्गज नेमबाज अमनप्रीत सिंग, मनू भाकर, मेघना सज्जनार हे चमकले.
या
स्पर्धेत 50 नेमबाज आपल्या घरुनच सहभागी झाले. त्यांच्यासाठी इलेक्ट्रॉनिक टारगेट लावण्यात
आले. 10 मी. एअर रायफलमध्ये ऑस्ट्रियाचा
मार्टिन
स्ट्रेम्फल 632.5 गुणांसह अव्वल आला. सज्जनार 630.5 गुणांसह दुसरा तर फ्रान्सचा जेरमोंड
तिसरा आला. या प्रकारातील भारताचा आघाडीचा नेमबाज दिव्यांशसिंग पन्वर चौथे स्थान मिळाले.
अमेरिका, रशियामध्ये ऑनलाईन चाचणी
आगामी काळात अमेरिका व रशियामध्ये प्रतिबंधित द्रव सेवन विरोधी चाचण्यासुध्दा (अँटीडोपिंग टेस्ट) आता ऑनलाईन होणार आहेत. अर्थात, या चाचण्या कितपत यशस्वी होतात यावर त्यांचे पुढील भविष्य अवलंबून असणार आहे. मात्र, अमेरिका व रशिया सारखे दिग्गज देश यामध्ये उतरले असल्याने या चाचण्या यशस्वी होतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
यासाठी ऑलिम्पिक विजेती अमेरिकन जलतरणपटू केटी लेडिकी हिने पुढाकार घेतला आहे.
आता कोरोनाच्या वातावरणात प्रत्यक्ष भेट घेऊन नमुने घेणे कधी शक्य होईल हे अनिश्चित आहे. म्हणून व्हर्च्युअल पध्दतीने नमुने घेता येतील का, याची चाचपणी अमेरिकन उत्तेजक प्रतिबंधक चाचणी संस्थेने सुरू केली आहे. त्यात टेलिफोन आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मदत घेतली जाणार आहे.
डोपिंग चाचण्यांसाठी ऑनलाईन पध्दतीचा होणार फायदा
सध्याच्या घडीला अमेरिकेन रोज एका तासाच्या कालावधीत खेळाडूंना चाचणीसाठी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. या काळात चाचणी घेणारे कधीही कोणत्याही खेळाडूची भेट घेऊन त्याचे नमूने घेऊ शकतात. आता प्रत्यक्ष भेटीऐवजी व्हिडिओ कॉलने ते होणार आहे. यानंतर, रशियामध्ये देखील हा प्रयोग राबवण्यात येणार आहे.
-जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्था