प्रभाग फेररचना मसुदा जनतेसाठी खुला : राज्य निवडणूक आयोगाकडून माहिती
प्रतिनिधी /पणजी
राज्य विधानसभेसाठी निवडणूक सुखनैव पार पडल्यानंतर गोव्यात आता पंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगही तयारीस लागला असून प्रभाग फेररचनेचा टप्पा पूर्णही करण्यात आला आहे. या फेररचनेचा मसुदा आज गुरुवार 24 फेब्रुवारीपासून जनतेसाठी खुला करण्यात येणार आहे.
राज्यातील 186 पंचायतींसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने करण्यात आलेल्या प्रभाग फेररचनेचा मसुदा जनतेच्या सूचना, सुधारणा आणि दुरुस्तीसाठी आज दि. 24 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान खुला ठेवण्यात येणार आहे. जनतेकडून आलेल्या सूचना आणि आक्षेपांचा विचार केल्यानंतर 8 मार्च रोजी प्रभाग फेररचनेस अंतिम स्वरूप देण्यात येईल. त्यानंतर आरक्षणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
मसुदे मामलेदार कार्यालयात उपलब्ध
या कामासाठी मामलेदार आणि संयुक्त मामलेदार यांची निवडणूक नोंदणी अधिकारी आणि अव्वल कारकून व मुख्य कारकून यांची साहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सदर मसुदे संबंधित मामलेदार कार्यालयात उपलब्ध करण्यात येणार आहेत.
वाडय़ावाडय़ांवर इच्छुक लागले तयारीस
निवडणूक जवळ पोहोचली असल्याने आतापासूनच गावागावातून इच्छुक तयारीस लागले आहेत. काहींनी तर स्वतःच्या प्रभागात मतदारांशी संपर्कही वाढविला असून मतदारांची कामे, तसेच त्यांना मदत करू लागले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्ते बनून उमेदवारांसोबत फिरताना अनेक इच्छुकांनी अप्रत्यक्षरित्या स्वतःच्या मतदारांशी चांगला संपर्क प्रस्थापित करण्यात यश मिळविले आहे. त्यातून अप्रत्यक्षरित्या त्यांच्या प्रचाराची एक फेरी पूर्ण होण्यात मदत झाली आहे.
विद्यमान व्यवस्थेनुसार राज्यात पाच, सात, नऊ आणि अकरा अशा प्रभागांच्या ग्रामपंचायती आहेत. फेररचनेनंतर त्यातील अनेक पंचायतींच्या प्रभागात आमुलाग्र बदल होण्याची शक्यता असते. काही पंचायतीत मतदारसंख्या वाढल्यास प्रभागसंख्याही वाढू शकते, असे चित्र आहे.