माध्यान्ह आहारासोबतच दुधाचेही वितरण : विद्यार्थ्यांचीही हजेरी समाधानकारक
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळे पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग मंगळवारपासून पूर्णवेळ भरविण्यास सुरुवात झाली. दोन वर्षाच्या कालावधीनंतर प्रथमच प्राथमिक शाळा पूर्णवेळ भरल्या. मंगळवारी या शाळांमध्ये माध्यान्ह आहाराचे वितरण करण्यात आले. याचसोबत सकाळच्या सत्रात शिरभाग्य योजनेंतर्गत दुधाचे वाटपही करण्यात आले. परंतु दिवाळीमुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र काही प्रमाणात कमी असल्याचे दिसून आले.
कोरोनामुळे राज्यातील बंद असलेल्या शाळा व महाविद्यालये हळूहळू खुली करण्यात आली. महाविद्यालय, पदवीपूर्व कॉलेज, हायस्कूल, उच्च प्राथमिक वर्ग सुरू केल्यानंतर 25 ऑक्टोबरपासून पाचवीपर्यंतच्या प्राथमिक शाळा सुरू केल्या. एक आठवडा अर्धा दिवस शाळा भरविण्यात आल्या.. आता या शाळा पूर्णवेळ भरण्यास सुरुवात झाली आहे. दसरा सुटीनंतर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार वितरण सुरू करण्यात आले.
दुधाचेही वाटप
मंगळवारपासून पूर्ण वेळ प्राथमिक वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात दुधाचे वितरण करण्यात आले. तर दुपारच्या सत्रात माध्यान्ह आहार देण्यात आला. दीड ते दोन वर्षाच्या कालावधीनंतर प्राथमिक शाळांमध्ये पुन्हा एकदा माध्यान्ह आहार वितरण सुरू करण्यात आले आहे.
– एस. यू. कपिलेश्वरी(प्रभारी मुख्याध्यापिका, शाळा क्र. 20 गोंधळी गल्ली)