बेळगाव/ प्रतिनिधी
बेळगावमधील विमान प्रवाशांना नववर्षानिमित्त आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. मागील अनेक दिवसांपासून मागणी होत असलेली बेळगाव- चेन्नई थेट विमानसेवा फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येत आहे. इंडिगो एयरलाइंसने ही सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असून येत्या 2 फेब्रुवारीपासून विमान सेवेला सुरुवात होणार आहे.
बेळगाव एक शैक्षणिक शहर असल्यामुळे याठिकाणी उच्च शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थी आज चेन्नई येथे विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. चेन्नई हे देशातील एक अग्रगण्य शहर असून याठिकाणी नोकरदार, आयटी कंपन्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे बेळगाव ते चेन्नई या मार्गावर थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. यासंदर्भात वेळोवेळी केंद्राकडे या शहराला विमानसेवा सुरू करण्यासाठी मागणी करण्यात येत होती. मध्यंतरी तृ जेटने मैसूर येथून कनेक्टिव्हिटी देऊन बेळगाव – चेन्नई विमानसेवा सुरू केली होती. परंतु थेट विमानसेवेचे मागणी होती
अशी असणार विमानसेवा
चेन्नई येथून सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी निघालेले विमान सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी बेळगावला पोहोचणार आहे. तर दहा वाजून 55 मिनिटांनी निघालेले विमान एक वाजून 15 मिनिटांनी चेन्नईला पोहोचणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बाराव्या शहराला बेळगाव मधून थेट विमानसेवा
यापूर्वी बेळगाव मधून अकरा शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध होती आता चेन्नई मुळे 12 शहरांना थेट विमान प्रवास करता येणार आहे. मुंबई, पुणे, बेंगलोर, मैसूर, तिरुपती, कडप्पा, हैदराबाद, सुरत, नाशिक, अहमदाबाद व इंदूर या शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे.