- पहिला टप्पा : 27 ऐवजी 28 फेब्रुवारीला
- दुसरा टप्पा : 3 ऐवजी 5 मार्चला मतदान
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय निवडणूक आयोगाने मणिपूर विधानसभेसाठी मतदानाच्या तारखांमध्ये बदल जाहीर केला आहे. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 27 फेब्रुवारी ऐवजी आता 28 फेब्रुवारीला होणार आहे. तर दुसऱया टप्प्यातील मतदान 3 मार्चऐवजी 5 मार्चला होणार आहे. स्थानिक कारणामुळे मतदानाची तारीख बदलत असल्याचे निवडणूक आयोगाने गुरुवारी स्पष्ट केले. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुशील चंद्रा गेले दोन दिवस मणिपूर दौऱयावर होते. यावेळी निवडणूक तयारी आणि व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला.
पंजाबपाठोपाठ मणिपूरमध्येही निवडणूक वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. याआधी निवडणूक आयोगाने पंजाबमधील मतदानाची तारीख बदलली होती. मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान होत आहे. मतदानाची तारीख बदलली असली तरी निकाल मात्र 10 मार्च रोजीच जाहीर करण्यात येणार आहे.