बेळगाव-नागपूर विमानसेवा 16 मार्चपासून होणार सुरू : स्टार एअरने दिली माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱया नागपूर शहराला आता बेळगावमधून विमानसेवा सुरू होत आहे. 16 मार्चपासून आठवडय़ातून 3 दिवस ही विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती स्टार एअरने दिली आहे. या विमान प्रवासासाठी 3499 रुपये तिकिटाचे प्राथमिक दर ठेवण्यात आले आहेत. यामुळे नागपूरला जाणाऱया प्रवाशांची या विमानामुळे सोय होणार आहे.
स्टार एअरचे संचालक श्रेणिक घोडावत जानेवारीमध्ये बेळगाव येथे आले असताना त्यांनी बेळगाव- नागपूर विमानसेवा लवकर सुरू करीत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे ही विमानसेवा कधी सुरू होणार याविषयीची उत्सुकता प्रवाशांमध्ये होती. यापूर्वी स्टार एअर मुंबई, बेंगळूर, अहमदाबाद, इंदूर, नाशिक, सुरत, अजमेर या शहरांना विमानसेवा देत होती. त्यामध्ये आता जयपूर व नागपूरची भर पडणार आहे. यामुळे स्टार एअर बेळगावमधून सर्वांधिक शहरांना विमानसेवा देणारी विमान कंपनी ठरली आहे.
अशी असणार विमान सेवा
अवघ्या दीड तासात बेळगावमधून विमानाने नागपूरला पोहोचता येणार आहे. बेळगावमधून नागपूरला थेट बस अथवा रेल्वे नसल्यामुळे पुणे येथून आतापर्यंत प्रवास करावा लागत होता. परंतु आता थेट विमानसेवा उपलब्ध होणार आहे. दुपारी 3.20 वा. बेळगाव विमानतळावरून निघालेले विमान 4.45 वा. नागपूरला पोहोचणार आहे. तर नागपूर येथून सायंकाळी 5.10 वा. निघालेले विमान 6.35 वा बेळगावला पोहोचणार आहे. मंगळवार, गुरुवार व रविवार असे तीन दिवस विमानसेवा देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील चौथ्या शहराला विमानसेवा
महाराष्ट्र व बेळगावचे जवळचे संबंध आहेत. बेळगावमधील अनेकजण नोकरीनिमित्त महाराष्ट्राच्या अनेक भागात स्थायिक आहेत. तसेच बेळगाव परिसरात असणाऱया उद्योगांमध्ये महाराष्ट्रातील अनेकजण कार्यरत आहेत. त्यामुळेच मुंबई, पुणे, नाशिक शहरांना बेळगावमधून विमानसेवा सुरू आहे. आता यामध्ये नागपूरची भर पडणार आहे. नागपूर विमानतळ हे कार्गो वाहतुकीसाठी ओळखले जात असल्याने याचा फायदा बेळगावलाही होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.