दोन दिवसांच्या दौऱयावर दाखल : 9 किमी लांबीचा रोड शो ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
अहमदाबाद / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 मार्चला दोन दिवसीय गुजरात दौऱयावर आहेत. पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱयाच दिवशी मोदी गुजरातमध्ये दाखल झाल्याने कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहमदाबाद दौरा यशस्वी करण्यासाठी भाजपने मोठी मेहनत घेतली आहे. मोदींच्या रोड शोदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने कार्यकर्त्यांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी भाजप समर्थक ‘जय श्री राम, भारत माता की जय’ अशा घोषणा देत होते. या रोड शो नंतर सायंकाळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांसह जनतेला संबोधित केले.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने पुन्हा एकदा भाजपच्याच पारडय़ात मते टाकली आहेत. तसेच गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये पक्षाने यशस्वी कामगिरी नोंदवत सत्ता टिकवली आहे. या निवडणुकीनंतर आता गुजरातची विधानसभा निवडणूक बहुमतात जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरातमधील अहमदाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला होता. या रोड शोदरम्यान निवडणुकीतील विजयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱयावर वेगळाच आत्मविश्वास दिसत होता. मोदी यांचा हा रोड शो म्हणजे गुजरातच्या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठीच्या तयारीची सुरुवात असल्याचे मानले जात आहे.
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी आयोजित रोड शोदरम्यान भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. या रोडशोदरम्यान पंतप्रधान मोदींसह भाजपचे कार्यकर्ते प्रथमच भगव्या रंगाच्या टोप्या परिधान करताना दिसून आले. मोदींच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा 50 प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले होते. येथे त्यांच्या स्वागतासाठी 4 लाख लोक जमल्याचा दावा केला जात होता. विमानतळापासूनच्या 9 किमी लांबीच्या रोड शोनंतर पंतप्रधान मोदी बैठकीसाठी भाजप कार्यालयात पोहोचले. अहमदाबादमध्ये पंतप्रधान गुजरातमधील पक्षनेत्यांची बैठकही घेतली. यानंतर सायंकाळी सरपंच परिषदेला उपस्थित राहिले. त्यात सुमारे 1.50 लाख लोक सहभागी झाले होते. कोरोनासंसर्गातील निर्बंधांनंतर मोदी प्रथमच गुजरातमध्ये मोठय़ा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.
क्रीडा महोत्सवाचे करणार उद्घाटन
12 मार्च रोजी पंतप्रधान मोदी नवरंगपुरा येथील सरदार पटेल स्टेडियममध्ये क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करतील. यादरम्यान सरदार पटेल स्टेडियमवर 1100 कलाकारांसह दिमाखदार रोषणाईचा कार्यक्रमही होणार आहे. यामध्ये स्पर्धकांसह इतर खेळांशी संबंधित लोकही उपस्थित राहणार आहेत. सरदार पटेल स्टेडियमशिवाय राज्यातील 500 हून अधिक ठिकाणी क्रीडा स्पर्धा रंगणार आहेत. यासाठी 46 लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. तसेच ते विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ सोहळय़ालाही उपस्थित राहणार आहेत.