पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हय़ात प्रवेशकर्त्यांच्या चाचण्या : आरोग्य केंद्रांना दिलेल्या किटस्वर गंडांतर
किटस् उपलब्ध न झाल्यास दोन दिवसांचाच साठा
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
जिल्हय़ात प्रवेश करणाऱया प्रत्येकाची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचे तसेच शहरांच्या ठिकाणी अनावश्यक फिरणाऱयांचीही टेस्ट सुरू झाली आहे. यासाठी तसे पहायला गेल्यास पालकमंत्र्यांचे अभिनंदनच करायला हवे. पण, अशा घोषणा करताना ‘हाती नाही दाणा’… अशी अवस्था होऊ नये, याचीही काळजी घ्यायला हवी होती. आजच्या स्थितीत ज्या पद्धतीने रॅपिड टेस्ट केली जात आहे त्याचा ओघ पाहता फक्त कणकवली तालुक्यातील सीमेवर व रल्वेस्टेशनवर होणाऱया तपासणीसाठी दिवसाला किमान 500 किटची गरज आहे. आजच्या स्थितीत जिल्हा पातळीवर दोन दिवसाला पुरतील एवढय़ाच रॅपिड अँटिजेन किट शिल्लक असतील तर असा ‘राजा उदार होऊन’ कसे काय चालणार? पुढील टप्प्यात किट वेळेत न मिळाल्यास अत्यावश्यक रॅपिड चाचण्याही बंद होतील. यासाठी ‘सुयोग्य नियोजना’ची नितांत आवश्यकता बनली आहे.
जिल्हय़ात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात प्रवेश करणाऱया प्रत्येकाची तसेच जिल्हय़ात अनावश्यक फिरणाऱया प्रत्येकाची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली. पालकमंत्र्यांच्या या घोषनेनंतर रविवारपासून जिल्हय़ाच्या प्रवेशद्वारावर व रेल्वे स्टेशनवर तशाप्रकारच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या. तसेच शहरांमध्येही अनावश्यक फिरणाऱयांच्या रॅपिड चाचण्याही करण्यात येऊ लागल्या.
राजा उदार पण…
पालकमंत्र्यांनी केलेल्या घोषणेबद्दल निश्चितच कौतुक आहे, पण अशी घोषणा करता वस्तुस्थितीशी सांगड घालणारी घोषणा असेल तर त्याचे दिर्घकालीन चांगले परिणाम दिसतात. अन्यथा, अशा घोषणा आततायीपणाच्या ठरण्याचीच शक्यता अधिक असते. कारण पालकमंत्र्यांच्या घोषणेनंतर रविवारी सुरू करण्यात आलेल्या या टेस्टसाठी एका दिवसात सुमारे 500 च्या जवळपास रॅपिड किट वापरण्यात आल्या. अशाप्रकारे दररोज किटचा वापर करावयाचा म्हटला तर तेवढय़ा प्रमाणात किट उपलब्ध व्हायला हव्यात. पण, आजघडीला एवढय़ा प्रमाणात किटस् उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते.
दोन दिवसाला पुरतील एवढय़ाच किट
उपलब्ध माहितीनुसार जिल्हा आरोग्य विभागाकडे सद्यस्थितीत एक हजार ते बाराशे एवढय़ाच किट उपलब्ध आहेत. ज्या पद्धतीने रॅपिड अँटिजेन किटचा वापर केला जात आहे ती पद्धत पुढे चालू राहिली तर पुढील दोन दिवसांत उपलब्ध किट संपण्याची शक्यता आहे. यासाठी अगोदर किट उपलब्ध करून नंतरच पुढील कार्यवाही व्हायला हवी. अन्यथा पुढील दिवसांत किट न आल्यास अत्यावश्यक वेळी रॅपिड करण्यासही किट मिळणार नाहीत, अशी स्थिती निर्माण होईल.
प्रा. आ. केंद्रातूनही मागविल्या किट
उपलब्ध माहितीनुसार काही प्राथमिक आरोग्य केंदांना देण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन टेस्ट किटपैकी काही किट सोमवारी प्रवेशद्वारावरील तपासणीसाठी परत मागण्यात आल्याचे समजते. त्यामुळे पुढील दिवसात प्रा. आ. केंद्राना रॅपिड किटच्या तुटवडय़ाची समस्या निर्माण होऊ शकते.
निर्णयाचा पुनर्विचार हवा
आरोग्य विभागाकडून प्रवेशद्वारावर, रेल्वेच्या ठिकाणी ज्यांना लक्षणे दिसतात किंवा थर्मल गन स्कॅनिंगमध्ये ताप दिसल्यास त्यांची टेस्ट जरूर करा. पण, ज्यांना लक्षणे नाहीत, त्यांची नावे, पत्ते घेऊन सध्या कार्यरत करण्यात आलेल्या ग्राम नियंत्रण पथकाला कळवून, तसेच तेथील आरोग्य कर्मचाऱयांना कळवून त्यांच्यावर नजर ठेवणे, लक्षणे दिसल्यास त्यांची प्रा. आ. केंदांमध्ये आरटीपीसीआर चाचणी करणे आदी उपाययोजनांचा मार्ग काढण्यात आला होता. मात्र, रॅपिडमुळे ही कार्यवाही थांबली. रॅपिड किटचा पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत या पर्यायाचा विचार करण्याची गरज आहे.
तुटवडा झाल्यास काय?
रॅपिड अँटिजेन किटचा तुटवडा झाल्यास अत्यावश्यकवेळी गरोदर माता, रुग्ण वा तातडीची शस्त्रक्रिया करणे तसेच कोरोनाची लक्षणे असलेल्या पण आरटीपीसीआर न झालेल्या रुग्णाची तातडीने चाचणी करावयाची असल्यास काय करायचे? असा सवाल उपस्थित होत आहे.