स्टार एअरची 18 पासून सेवा : कंपनीकडून बुकिंगही सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
मागील महिन्यापासून स्पाईस जेट कंपनीने बेंगळूर सेवा बंद केली. यामुळे सकाळच्या सत्रात बेंगळूरला येण्या-जाण्यास विमान उपलब्ध नसल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये विमानफेरी सुरू करावी, अशी मागणी होत होती. अखेर स्टार एअरने येत्या 18 डिसेंबरपासून बेळगाव-बेंगळूर-बेळगाव अशी विमानफेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने बुकिंगही सुरू केले आहे.
स्टार एअरने मागील वषी बेळगाव-बेंगळूर ही विमानसेवा सुरू केली होती. परंतु तांत्रिक कारणामुळे काही महिन्यांनंतर ही फेरी बंद करण्यात आली. बेळगाववरून बेंगळूरला जाण्यासाठी इंडिगो, स्पाईस जेट, अलायन्स एअर अशी तीन विमाने सेवा देत होती. परंतु स्टार एअरने नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपासून ही विमानसेवा बंद केली. अचानक फेरी रद्द केल्यामुळे सकाळच्या सत्रात बेंगळूरवरून बेळगावला येणाऱया प्रवाशांना याचा फटका बसला.
बेळगावला उपराजधानीचा दर्जा देऊन सुवर्णविधानसौध येथे अनेक सरकारी कार्यालये आणण्यात आली आहेत. त्यामुळे सकाळी बेंगळूरवरून बेळगावला हे सरकारी कर्मचारी ये-जा करतात. त्याचसोबत बेळगाववरून बेंगळूरला सकाळी जाऊन संध्याकाळी परतणाऱया व्यापाऱयांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात विमानफेरी सुरू करण्याची मागणी केली जात होती. स्पाईस जेटची फेरी बंद झाल्यानंतर या काळात नवी फेरी सुरू करण्यासाठी बेळगाव विमानतळ प्राधिकरणाकडून प्रयत्न केले जात होते. अखेर हे प्रयत्न फळाला आले असून, स्टार एअर बेंगळूर फेरी सुरू करणार आहे.
अशी असणार बेळगाव-बेंगळूर फेरी
घोडावत ग्रुपचे स्टार एअर आठवडय़ातून 3 दिवस ही विमानफेरी सुरू करत आहे. सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस ही विमानफेरी असणार आहे. सकाळी 8.55 वा. उड्डाण घेतलेले विमान 10 वा. बेंगळूर विमानतळावर पोहोचणार आहे. तर 10.30 वा. बेंगळूर येथून निघालेले विमान 11.35 वा. बेळगावला पोहोचणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.