ऑनलाईन टीम/तरुण भारत
सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करणं शुभ मानल जात. अनेक ग्राहक सोनं खरेदीसाठी पसंती देतात. त्यामुळे जर तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर केंद्र सरकारकडून १०० टक्के शुद्ध सोनं खरेदी करण्याची सुवर्ण संधी देण्यात आली आहे. यासाठी तुम्ही २५ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबरपर्यंत सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करू शकता. त्या अंतर्गत सोने २४ कॅरेट खरेदीसाठी प्रति ग्रॅम ४१७५ रुपयांची किंमत निश्चित करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने सॉवेरन गोल्ड खरेदीसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या ग्राहकांनासाठी डिजिटल पेमेंटमध्ये प्रति ग्रॅम सोन्यामागे ५० रुपयांची सूट दिली आहे. म्हणजेच डिजिटल पेमेंट करताना एक ग्रॅम सोन्यासाठी ४१२५ रुपये द्यावे लागतील. याच २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची बाजार किंमत आज ४७८० रुपये इतकी आहे.
आर्थिक वर्ष २०२१ -२२ साठीच्या सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या तिसऱ्या मालिकेअंतर्गत ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान ४ टप्प्यांत बॉन्ड जारी केले जातील. तर आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये एकूण १० टप्प्यांत सॉवरेन गोल्ड बॉन्ड लाँच केले जातील. यापैकी, मे २०२१ ते सप्टेंबर २०२१ पर्यंत ६ टप्प्यांत सॉवरेन गोल्ड बॉन्ड सुरू करण्यात आले आहेत. आत्ताची सातवी मालिका आहे.