पुण्यातील कंपनीकडून कोविसेल्फ किट तयार : 2 मिनिटांत चाचणी शक्य : 15 मिनिटांत मिळणार निष्कर्ष
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोनाच्या चाचणीसंबंधी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) मोठा निर्णय घेतला आहे. आयसीएमआरने घरात कोरोनाची चाचणी करण्यासाठी एका रॅपिड अँटीजेन टेस्ट किटला मंजुरी दिली आहे. हे टेस्टिंग किट पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन कंपनी तयार करत आहे. या किटच्या मदतीने लोक केवळ 2 मिनिटांत स्वतःची चाचणी करून 15 मिनिटांमध्ये निष्कर्ष प्राप्त करू शकतात. या टेस्टिंग किटची किंमत केवळ 250 रुपये ठेवण्यात आली आहे.
होमबेस किंवा सेल्फ टेस्टिंग किटला मंजुरी मिळणारी मायलॅब इंडिया देशातील पहिली कंपनी ठरली आहे. कोविसेल्फ नावाने हे टेस्ट किट बाजारात सादर केले जाणार आहे. हे होम टेस्टिंग किट असून ते 7.5 लाख फार्मसी स्टोअरवर ऑफलाईन आणि सर्व ई-कॉमर्स वेबसाइट्सवर ऑनलाईन खरेदी करता येणार असल्याची माहिती कंपनीचे संस्थापक सुजीत जैन यांनी दिली आहे.
होम टेस्टिंग केवळ लक्षणेयुक्त रुग्णांसाठी असल्याचे आयसीएमआरने स्पष्ट केले आहे. कोरोनाबाधिताच्या थेट संपर्कात आलेल्या लोकांनाही या किटद्वारे चाचणी करता येणार आहे. या टेस्टिंग किटसोबत इन्स्ट्रक्शन मॅन्युअल देण्यात येत असल्याने त्याचा वापर करणे सोपे ठरणार आहे.
गोपनीयता राहणार कायम
होम टेस्टिंग करणाऱया लोकांना टेस्ट स्ट्रिप पिक्चर काढावी लागेल आणि मोबाईल ऍप डाउनलोड असलेल्या मोबाइलमधूनच त्याचे छायाचित्र काढावे लागणार आहे. मोबाइल फोनचा डाटा थेट आयसीएमआरच्या टेस्टिंग पोर्टलवर संग्रहित होणार आहे. पण रुग्णाची गोपनीयता कायम राहणार आहे. या चाचणीद्वारे पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांना कोरोनाबाधित मानले जाणार आहे. अशा लोकांसाठी अन्य चाचण्यांची गरज भासणार नाही.
मानावे लागणार नियम
कोरोनाबाधित आढळून येणाऱयांना होम आयसोलेशनवरून आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशांचे पालन करावे लागणार आहे. लक्षणेयुक्त रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना आरटीपीसीआर चाचणी करवून घ्यावी लागणार आहे.
होम टेस्ट किटचा कसा वापर कराल?
- युजर मॅन्युअलनुसार नेजल स्वॅबला दोन्ही नॉस्ट्रिल्समध्ये 2 ते 4 सेंटीमीटर आतपर्यंत न्यावे.
- त्यानंतर स्वॅबला दोन्ही नॉस्ट्रिल्समध्ये 5 वेळा फिरवा.
- स्वॅबला आधीच भरलेल्या टय़ूबमध्ये ठेवा आणि उर्वरित स्वॅब तोडून टाका.
- टय़ूबचे झाकण बंद करा.
- टेस्ट कार्डवर टय़ूब दाबून एका मागामोग एक दोन थेंब टाका.
- निष्कर्षासाठी 15 मिनिटांची प्रतीक्षा करा.
- 20 मिनिटांनी निष्कर्ष प्राप्त झाल्यास तो अवैध समजावा.
- टेस्ट कार्डवर दोन भाग असतील, यातील एक कंट्रोल दुसरा टेस्ट सेक्शन.
- बार जर केवळ कंट्रोल सेक्शनमध्ये (सी) दिसल्यास निष्कर्ष निगेटिव्ह आहे.
- बार जर कंट्रोल आणि टेस्ट सेक्शनमध्ये दिसल्यास टेस्ट पॉझिटिव्ह आहे असा अर्थ होतो.