केंद्रीय मंत्र्यांच्या वाहनताफ्याची शेतकऱयाला धडक
चंदिगढ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱयांना वाहनाखाली चिरडल्याची घटना ताजी असतानाच हरियाणातील अंबाला जिह्यातील नारायणगढमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. कुरुक्षेत्रातील भाजपचे खासदार नायबसिंग सैनी यांच्या वाहनताफ्याने शेतकऱयाला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. गाडीच्या धडकेमुळे जखमी झालेल्या भवनप्रीत नामक शेतकऱयावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच शेतकरी घटनास्थळी जमा झाले होते. त्याचदरम्यान सुरक्षेसाठी घटनास्थळी मोठय़ा प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
खासदार नायबसिंह सैनी नारायणगढ येथील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. त्यांच्या आगमनाची माहिती मिळताच शेतकरी निषेध करण्यासाठी पोहोचले. या कार्यक्रमानंतर सैनी आपल्या ताफ्यासह निघाले असताना भवनप्रीत अचानक रस्त्यावर आला. त्यानंतर खासदारांच्या ताफ्यातील गाडी त्याला धडकली. भवनप्रीतला धडक देणारी इनोव्हा कार खासदार नायबसिंग सैनीच्या नावाने नोंदणीकृत असल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला आहे. घटनेनंतर शेतकऱयांनी त्याचा चालक राजीव याच्या विरोधात नारायणगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.