नामवंत गायकांच्या होणार संगीत मैफली : यावर्षीचा उत्सव आतीलपेठ दहाजण बाजारकर मंडळातर्फे
प्रतिनिधी /डिचोली
आतीलपेठ डिचोली येथील श्री देवी शांतादुर्गेच्या मठमंदिरात श्री शांतादुर्गा देवस्थान नवा सोमवार उत्सव समितीतर्फे सोमवार दि. 13 रोजी देवीचा प्रसिद्ध नवा सोमवार उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी आतीलपेठ दहाजण बाजारकर मंडळातर्फे हा उत्सव साजरा करण्यात येत असून त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या उत्सवात नामवंत गायक कलाकारांच्या संगीत मैफली आयोजित करण्यात आल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले.
या उत्सवानिमित्त सकाळी 9.30 वा. आतीलपेठ मठमंदिरात पुण्याहवाचन, आचार्यपूजन, प्राकारशुद्धी, 10.30 वा. लघुरुद्र, दु. 1.30 वा. आरती व प्रसाद. रात्री 8 वा. देवीची पालखी मठमंदिरातून बाहेर निघेल व श्री लक्ष्मीनारायण मंदिराजवळ भाविकांसाठी रात्री 10 पर्यंत ठेवली जाणार. या दरम्यान तेथे भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 10 वा. बँडपथकासह पालखी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. पालखी आतीलपेठ, सोनारपेठ, भायलीपेठ व बोर्डे वडाकडे पर्यंत जाऊन माघारी फिरून भायलीपेठ, सुंदरपेठमार्गे आतीलपेठ येथील मठमंदिरात मंगळवारी दुपारी विधीवतपणे दाखल झाल्यानंतर या उत्सवाची सांगता होणार आहे.
गायनाच्या संगीत मैफली
आतीलपेठ येथील या उत्सवातील पहिली संगीत मैफल आतीलपेठ मठमंदिरात होणार आहे. त्यात प्रसिद्ध गायिका दिपिका भिडे भागवत (मुंबई) व धनंजय म्हसकर (मुंबई) हे बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यांना तबल्यावर रोहिदास परब, संवादिनीवर मनोज गणपुले हे साथसंगत करतील. या कार्यक्रमाचे ध्वनी संकलन सर्वेश फुलारी यांचे राहील. या उत्सवाची दुसरी संगीत मैफल रात्री 11 वा. गुरुफंड ट्रस्ट, भायलीपेठ येथे होणार आहे. या मैफलीत प्रसिद्ध गायक सुरेंद्र न. गोवेकर व भाग्यश्री आठल्ये जोशी (देवगड) या गायन सादर करणार आहेत. त्यांना तबल्यावर महेश वझे, संवादिनीवर जयेंद्र गोवेकर, पखवाज ओंकार गावकर, मंजिरीवर गोपाळ प्रभू हे कलाकार साथसंगत करतील. या कार्यक्रमाचे निवेदन नितीन रावळ करणार आहेत. ध्वनीसंकलन नरेश नाईक यांचे असेल.