पहिल्या दिवसअखेर भारत 6 बाद 233, मधल्या षटकातील पडझडीचा फटका
ऍडलेड / वृत्तसंस्था
विराट कोहलीचे ऍडलेडवरील दमदार फलंदाजीचे पर्व त्याला धावचीत व्हावे लागल्याने संपुष्टात आल्यानंतर फलंदाजी लाईनअप आणखी कोसळली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर भारताला 89 षटकात 6 बाद 233 धावांवर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियन संघावर पूर्ण वर्चस्व गाजवणाऱया विराटने उत्तम जम बसवला होता. पण, रहाणेने 77 व्या षटकात एकेरी धावेसाठी दिलेला कॉल मागे घेतला आणि विराटची निराशा झाली. मधल्या षटकात डावाची पडझड झाल्यानंतर भारताची 3 बाद 188 धावांवरुन 6 बाद 206 अशी दैना उडाली होती.
शेवटची काही षटके खेळून काढणारे रविचंद्रन अश्विन (नाबाद 15) व वृद्धिमान साहा (नाबाद 9) यांनी सातव्या गडय़ासाठी 27 धावांची अभेद्य भागीदारी केली. फलंदाजीसाठी फारशी अनुकूल मानता येणार नाही, अशा स्थितीत विराटची खेळावरील हुकूमत येथे प्रकर्षाने दिसून आली. त्याने 180 चेंडूच्या आपल्या खेळीत गोलंदाजांवर उत्तम वर्चस्व गाजवले.
एकीकडे, कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराने (160 चेंडूत 43) अतिशय बचावात्मक पवित्र्यावर भर दिला असताना विराटने मात्र प्रत्येक चेंडूवर धावा घेण्याचा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवला. काही चांगल्या चेंडूवर तो बचावात्मक खेळला. पण, खराब चेंडूंचा समाचार घेण्यात त्याने काही कसर ठेवली नाही. विराटची रहाणेसमवेत चौथ्या गडय़ासाठी 88 धावांची भागीदारी लक्षवेधी होती आणि भारतीय संघ वर्चस्व गाजवण्याच्या दिशेने अग्रेसर होता. पण, याचवेळी रहाणेकडून अस्तित्वात नसलेली धाव घेण्याची घोडचूक झाली आणि विराटला बाद होत परतावे लागल्यानंतर भारताचे वर्चस्वही खालसा झाले. पुढे स्टार्कने नव्या चेंडूवर रहाणेला पायचीत केले. स्टार्क हा ऑस्ट्रेलियाचा दिवसभरातील सर्वोत्तम गोलंदाजही ठरला.
पृथ्वी शॉ, मयांककडून निराशा
तत्पूर्वी, दिवसातील पहिल्या सत्रात पृथ्वी शॉचे (0) खराब तंत्र पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आले. स्टार्कने त्याचा त्रिफळा उडवला. सहकारी सलामीवीर मयांक अगरवाल (40 चेंडूत 17) पॅट कमिन्सच्या एका अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत झाला. स्टार्क (19 षटकात 2-49), जोश हॅझलवूड (20 षटकात 1-47), पॅट कमिन्स (19 षटकात 1-42) या ऑस्ट्रेलियाच्या जलद त्रिकुटाने नियंत्रित, शिस्तबद्ध मारा करत भारतीय फलंदाजांना सातत्याने वेसण घातली. फक्त अव्वल दर्जाच्या विराटलाच ते रोखू शकले नाहीत. ती कसर जणू रहाणेच्या चुकीच्या कॉलने भरुन काढली आणि यामुळे विराटला स्वस्तात रोखता आले नसले तरी ऑस्ट्रेलियन संघ भारतासमोर पहिल्या दिवशी भारी ठरला.
धावफलक
भारत पहिला डाव : पृथ्वी शॉ त्रि. गो. स्टार्क 0 (2 चेंडू), मयांक अगरवाल त्रि. गो. कमिन्स 17 (40 चेंडूत 2 चौकार), चेतेश्वर पुजारा झे. लाबुशाने, गो. लियॉन 43 (160 चेंडूत 2 चौकार), विराट कोहली धावचीत (हॅझलवूड/लियॉन) 74 (180 चेंडूत 8 चौकार), अजिंक्य रहाणे पायचीत गो. स्टार्क 42 (92 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), हनुमा विहारी पायचीत गो. हॅझलवूड 16 (25 चेंडूत 2 चौकार), वृद्धिमान साहा नाबाद 9 (25 चेंडूत 1 षटकार), रविचंद्रन अश्विन नाबाद 15 (17 चेंडूत 1 षटकार). अवांतर 17. एकूण 89 षटकात 6 बाद 233.
गडी बाद होण्याचा क्रम
1-0 (शॉ, 0.2), 2-32 (मयांक, 18.1), 3-100 (पुजारा, 49.4), 4-188 (विराट, 76.6), 5-196 (रहाणे, 80.4), 6-206 (विहारी, 83.2).
गोलंदाजी
मिशेल स्टार्क 19-4-49-2, जोश हॅझलवूड 20-6-47-1, पॅट कमिन्स 19-7-42-1, कॅमेरुन ग्रीन 9-2-15-0, नॅथन लियॉन 21-2-68-1, मार्नस लाबुशाने 1-0-3-0.
बहरातील विराटला धावबाद केले!
ऍडलेड ओव्हलवर विराटची फलंदाजी हमखास बहरते, ही परंपरा या मालिकेतील पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवशी देखील कायम राहिली. विराटने 245 मिनिटे खेळपट्टीवर ठाण मांडत 180 चेंडूत 74 धावांची खेळी साकारली. यात 8 चौकारांचा समावेश राहिला. अर्थात, डावातील 77 व्या षटकात अजिंक्य रहाणेच्या एकेरी धावेसाठी दिलेल्या चुकीच्या कॉलने घात केला आणि विराटची खेळी संपुष्टात आली. लियॉनच्या या षटकात ऑफस्टम्पवरील फ्लायटेड चेंडू रहाणेने पुढे सरसावत ड्राईव्ह केला आणि एकेरी धावेसाठी प्रारंभी कॉल दिला. पण, नंतर त्याने अचानक धावेस नकारही दिला आणि तोवर विराट अर्धे अंतर धावून पुढे आला होता. हॅझलवूडने ही सोनेरी संधी अजिबात न दवडता नॉन स्ट्रायकर एण्डवरील लियॉनकडे चेंडू सोपवला आणि लियॉनने यष्टी उदध्वस्त केली, त्यावेळी विराट क्रीझच्या आसपासही नव्हता. विराटने नाराजीने रहाणेकडे पाहिले, त्यावेळी रहाणेच्या चेहऱयावरही केवळ हताशाच होती.
आणि स्वतःही पायचीत होत परतला!
विराटला चुकीचा कॉल देत धावचीत केल्यानंतर स्वतः अजिंक्य रहाणे देखील फार काळ खेळपट्टीवर टिकून राहिला नाही. उलटपक्षी, विराटला धावबाद केल्यानंतर त्याची स्वतःची एकाग्रता चांगलीच भंगली आणि त्याच्यावरील दडपण प्रत्येक चेंडूगणिक दिसून येत राहिले. नंतर 80 व्या षटकात स्टार्कच्या लेगस्टम्पवर स्विंग होत आलेला चेंडू रहाणेच्या पॅडवर आदळला आणि मुख्य पंचांनी ऑस्ट्रेलियाचे अपील उचलून धरत रहाणेला बाद दिले. रहाणे परतत असताना विहारीने त्याला लगेच परत बोलावले आणि डीआरएस घेण्याची सूचना केली. पण, रिप्लेत रहाणे बाद असल्याचे स्पष्ट झाले आणि भारताचा एक डीआरएस देखील कमी झाला.
अहो आश्चर्यम! पुजाराचा पहिला चौकार चक्क 148 व्या चेंडूवर!
संथ फलंदाजीसह खेळपट्टीवर ठाण मांडून राहण्याच्या वैशिष्टय़ामुळे चेतेश्वर पुजाराला ‘कसोटी स्पेशालिस्ट’ म्हणून ओळखले जाते. पण, बुधवारी येथे पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात तब्बल 147 चेंडूत एकही चौकार न मारता पुजाराने जणू कहरच केला. आपल्या 148 व्या चेंडूवर पुजाराने पहिला चौकार मारला, यावरुनच त्याच्या संथ खेळीची कल्पना यावी. पहिल्या दोन सत्रात त्याचा अति बचावात्मक पवित्रा भारताच्या जिव्हारी लागणारा ठरला. स्टार फिरकीपटू नॅथन लियॉनचे (21 षटकात 1-68) चेंडू सोडून देण्यावरच पुजाराचा भर राहिला. लियॉनला दोन क्लासिक चौकार खेचल्यानंतर त्याने ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. पण, यात त्याने लेगगलीवर तैनात लाबुशानेकडे सोपा झेल दिला आणि त्याची ही बचावात्मक खेळी देखील संपुष्टात आली. पुजारा 218 मिनिटे खेळपट्टीवर राहिला आणि त्याचा स्ट्राईक रेट 26.26 इतका किरकोळ होता.