डॉ. कीर्ती शिवकुमार यांचे प्रतिपादन : आविष्कार संस्थेचा वर्धापन दिन
प्रतिनिधी / बेळगाव
ईर्षा, मत्सर, अहंकार यात न अडकता महिलांनी स्वतःशीच स्पर्धा केली पाहिजे. त्याचवेळी आत्मनिर्भर होण्यासाठी परस्परांना सहकार्य केले पाहिजे, असे मत डॉ. कीर्ती शिवकुमार यांनी व्यक्त केले. आविष्कार महिला उद्यमशील संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त वरेरकर नाटय़ संघ येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर संस्थाध्यक्षा सुलभा खानोलकर होत्या. डॉ. कीर्ती म्हणाल्या, कोणताही व्यवसाय करताना प्रथम त्याचा पूर्ण अभ्यास करायला हवा. आपल्याला आवडतो तो व्यवसाय करण्यास हरकत नाही. परंतु, व्यवसायाची वृद्धी होण्यासाठी ग्राहकांना जे हवे आहे, त्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. समस्या नाही अशी एकही महिला नाही. म्हणूनच परस्परांना सहकार्य करून पुढे आले पाहिजे. लोक काय म्हणतील? याचा विचार न करता आपला मार्ग चालत रहा. याच कार्यक्रमात मंजुळा कल्याणशेट्टी यांना उषाताई गोगटे उद्योगिनी पुरस्कार व विजया सापळे यांना आविष्कार उद्योगिनी पुरस्कार देण्यात आला. मंजुळा कल्याणशेट्टी या व्यवसाय सांभाळून कृत्रिम दागिने तयार करतात. विजया या ब्युटीपार्लरला सौंदर्यप्रसाधने पुरवितात. या दोघींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी अक्षता आळतेकर यांनी गणेशवंदना सादर केली. विशाखा देशपांडे यांनी लता मंगेशकर यांची दोन गीते सादर केली. अध्यक्षांच्या हस्ते वक्त्यांचा सत्कार करण्यात आला. अपर्णा सामंत यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.