आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. जेव्हा तुम्ही एखादी क्रिया करता, त्यातून एक वेगळी ऊर्जा उत्पन्न होत असते. ही ऊर्जा तुमच्यातील आत्मविश्वासाची असते. हा आत्मविश्वास सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात.
व्यक्तिमत्वाचा विकास करणे अनेकांना अवघड बाब वाटते. परंतु, आपल्या दैनंदिन जीवनात आपण जसे वागतो, विचार करतो तसे आपले व्यक्तिमत्व घडते. समाजातील घटनांचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो. आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचमुळे आपण कमी पडल्याची भावना मनात निर्माण होते. त्यातून नैराश्य येते. आत्मविश्वास प्राप्त करण्यासाठी आणि तो टिकून ठेवण्यासाठी आपणास कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. सगळय़ांना आकर्षित करणारं व्यक्तिमत्व असावं, असं प्रत्येकाला वाटतं.
काही वेळा, काही प्रसंगांत आपल्या ध्येयाविषयी व ते गाठण्याविषयी काही शंका आपल्या मनात येतात व आपण मनाने डगमगू लागतो. त्यातून काळजी, भीती, शंका यामुळे आपल्या मनात अनिश्चितता निर्माण होते. यावर उपाय म्हणजे, आत्मविश्वास.
ठरवलेल्या ध्येयावर आपण ठाम राहाणे, ती गोष्ट प्रत्यक्षात येईल व त्या दृष्टीने तुमची योजना आहे व तुम्ही ती प्रयत्नपूर्वक राबवत आहात, तर मनाची जी अवस्था तुम्हाला ते करायला भाग पाडते, ती म्हणजे आत्मविश्वास! तुमचाच तुमच्या ध्येयावर विश्वास नसेल तर दुसरा कसा ठेवेल? तुम्हाला विश्वास नसेल तर काम करण्याचा उत्साह राहणार नाही, तुमची एकाग्रता राहणार नाही. दुसरे तुमच्याविषयी काय बोलतात याचा विचार तुम्ही करत बसाल, त्याचा तुम्हाला राग येईल, दुःख होईल. ह्यावर एकमेव उपाय म्हणजे, आत्मविश्वास बाळगणे.
दुसऱयाकडून शिकण्याची तयारी
आत्मविश्वास असल्यावर तुम्हाला बरोबर वाटणारी, तुम्ही ठरवलेली गोष्टच तुम्ही करता. तुम्ही काही जोखीम उचलून जास्तीचे काम करायला तयार होता. तुमच्या चुका मान्य करून दुसऱयाकडून शिकायची तयारी ठेवता. मेहनत करून यश मिळवताना कौतुकास पात्र होता व यश सर्व संबंधितांना घेऊन साजरेही करता.
एकदा ध्येय निश्चित केल्यावर, त्याचा आराखडा तयार केल्यावर परत-परत त्यावर शंका न घेता, अपयशाची तयारी ठेवून, आपल्या ध्येयाप्रति काम करत राहिले पाहिजे. त्यासाठी आवश्यक माहिती व ज्ञान मिळविल्याने आत्मविश्वास वाढतो. ज्या गोष्टीची भीती वाटते, ती गोष्ट करून बघितल्याने आत्मविश्वास वाढतो. तुमची तयारी व रणनीती विचार व अभ्यास करून केलेली असेल, तर तुमचा आत्मविश्वास वाढतो.
आयुष्यात घडणाऱया अनेक गोष्टींमुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनात व कामाच्या ठिकाणीही होत असतो. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला समाजात एक मानाचे स्थान मिळवून देतो. त्यामुळे तुमच्या मनावर झालेला आघात कितीही मोठा असला तरी काही एक्झरसाइज करा व तुमचा आत्मविश्वास परत मिळवा. यासाठी काही उपायः
आत्मस्तुती करा
दररोज सकाळी आरशासमोर उभे राहून तुमच्यात असलेले सर्व चांगले गुण आठवा. अप टू डेट राहण्याचा प्रयत्न करा. कोणतंही काम सोडतं घेऊ नका. पर्फेक्ट माइंडसेटने घराबाहेर पडा. दिवसभरात कोणीही तुमची कशाबद्दलही स्तुती केली तर आभार माना, परंतु गर्व बाळगू नका.
काळजी सोडा
चेहऱयावर प्रसन्नतेचा भाव व तेजस्वी हास्य असू द्या. आतून द्वंद असेल तरी ते भाव चेहऱयावर येता कामा नये. सर्वांना मदत करा. लोकांशी प्रेमाने बोला व वागा. मात्र, चुकत असलेल्यांना पाठीशी घालू नका. अधिक कठोर नाही तरी योग्यरीत्या त्याला मार्गदर्शन करा.
चांगली संगत निवडा
तुमचा आत्मविश्वास आजूबाजूच्या लोकांवरही अवलंबून असतो. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. जे लोक तुम्हाला प्रोत्साहित करत असतील व पडत्या काळात तुमची मदत करत असतील असे लोक योग्य मार्गदर्शन करतात. ती व्यक्ती कुटुंबातील, मित्र किंवा सहकारी असू शकते.
स्वतःसाठी वेळ काढा
दिवसभराच्या धावपळीत स्वतःला काय दिले याचा विचार करा. अर्थात स्वतःला वेळ द्या. थोडय़ा वेळासाठी एकांतात राहा. स्वतःबद्दल विचार करा. मेडिटेशन करा किंवा स्वतःच्या हॉबीला वेळ द्या. मग बघा आपला आत्मविश्वास कसा वाढतो ते….!