बंडू केरवाडकरसाठी पोलीस शोधमोहीम
प्रतिनिधी/ बेळगाव
खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून बापट गल्ली येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या प्रकरणी बंडू केरवाडकरविरुद्ध खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
विजय मनोहर गवाणे (वय 35) या युवकाने बंडूकडून 2 लाख रुपये घेतले होते. व्याज व मुद्दल वेळेत परत केले नाही म्हणून बंडू केरवाडकरने शुक्रवारी सकाळी त्याच्या घरी जावून पैसे देता आले नाही तर कोठे तरी जावून जीव दे असे धमकविल्याने विजयने आत्महत्या केल्याचे पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बंडू केरवाडकरला अटक करण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. सावकारी करण्यासाठी आवश्यक परवाना त्याच्याजवळ आहे का? याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.
उपलब्ध माहितीनुसार हा संपूर्ण व्यवहार तोंडी होता. मात्र, बंडूने विजयला धमकावल्या संबंधीचे काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी बंडूने आपला मोबाईल बंद ठेवल्याची माहिती मिळाली आहे. खडेबाजार पोलीस पुढील तपास करीत आहेत.