उमेश यादवच्या मुलीची अपेक्षा
सावंतवाडी:
माझे वडील उमेश यादव यांच्या आत्महत्येप्रकरणी आमची कोणतीही तक्रार नाही. तसेच कोणावरही राग किंवा संशय नाही. पोलिसांना आम्ही सर्व प्रकारचे सहकार्य केले. त्यांनीही आम्हाला सहकार्य केलेले आहे. भविष्यातही पोलिसांना सहकार्य केले जाईल. मात्र, आत्महत्येवरून चाललेले राजकारण बंद व्हावे आणि माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळावी, अशी अपेक्षा मुलगी कृतिका हिने पत्रकारांसमोर व्यक्त केली.
आपल्या निवासस्थानी कृतिका व तिच्या भावाने पत्रकार परिषद घेतली. तिने सांगितले की, आमच्या कुटुंबावर जो आघात झाला त्याने आम्ही आधीच व्यथित आहोत. आमच्या भावना समाजाने लक्षात घ्याव्यात. वडिलांच्या आत्महत्येविषयी उलट-सुलट चर्चा होत आहे. तसेच जे राजकारण होतंय ते योग्य नाही. त्यामुळे राजकारण बंद करावे.