पुलाची शिरोली / वार्ताहर
येथील आर्यन बुडकर आत्महत्येप्रकरणी खासदार धैर्यशील माने, सरपंच शशिकांत खवरे, कॉम्रेड गिरीष फोंडे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात गावातील सर्व शाळेंचे शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी बुडकर याच्या आत्महत्येस कारणीभूत असलेले सिम्बॉलीक इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष गणपत पाटील व मुख्याध्यापिका गिता पाटील यांची सखोल चौकशी करून कारवाई करून दोषी आढळल्यास स्कूलची मान्यता रद्द करावी तसेच कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
सरपंच शशिकांत खवरे, कॉ. गिरीष फोंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण यांनी भाषणामध्ये प्रशासनाने आर्यनच्या मृत्यूस कारणीभूत असलेले सिम्बॉलीक इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष व मुख्याध्यापिका यांच्यावर कठोर कारवाई करावी. व स्कूलची मान्यता रद्द करावी अशी मागणी केली.
मोर्चातील विद्यार्थ्यांनी अमर रहे!अमर रहे! आर्यन बुडकर अमर रहे!, बुडकर कुटूंबाला न्याय मिळालाच पाहिजे, सिम्बॉलीक इंटरनॅशनल स्कूल बंद झालेच पाहिजे, आरोपींना तत्काळ अटक झालीच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या.
या मोर्चात प्रकाश कौंदाडे, सुर्यकांत यादव, विठ्ठल पाटील, उदय पाटील, प्रल्हाद खवरे, उत्तम पाटील,सतीश पाटील,जोतिराम पोर्लेकर, लियाकत गोलंदाज, प्रल्हाद खोत, प्रल्हाद खवरे, प्रशांत कागले, राजू सुतार, अन्सार देसाई, डी.एम.चौगले, सचिन कोळी, बाजीराव पाटील, बाजीराव सातपुते यांच्यासह शिरोली गावचे ग्रामस्थ सहभागी झाले होते.