बेंगळूर / प्रतिनिधी
सँडलवूड ड्रग प्रकरणात कन्नड चित्रपट निर्माते आणि माजी मंत्र्याच्या मुलाच्या विरोधात लूकआऊट नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
निर्माता शिवप्रकाश आणि दिवंगत जीवनराज अल्वा यांचा मुलगा आदित्य अल्वा या प्रकरणातील संशयित आहेत आणि ते फरार असल्याचे समजत आहे. केंद्रीय गुन्हे शाखेकडून (सीसीबी) लुकआऊट नोटिसा बजावल्या गेल्या आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
लूकआऊट नोटीस पोलिसांना फरार संशयितांना पकडण्यात आणि त्यांना सीमा ओलांडण्यापासून प्रतिबंधित करते. दरम्यान अभिषेक नावाच्या आणखी एका संशयितास शोधण्यासाठी सीसीबीने नोटीसही बजावली आहे. कर्नाटक आणि इतर राज्यातील पोलीस ठाण्यांसह विमानतळांवरही संशयितांचा शोध घेण्यास सांगितले आहे.
फरार संशयित अद्याप भारतातच आहेत पण ते परदेशात पळून जाऊ शकतात, असा तपास करणाऱ्यांना विश्वास आहे. या नोटीसच्या माध्यमातून त्यांना बाहेर जाण्यापासून रोखाने असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हंटले आहे. सीसीबीने यापूर्वी अभिनेत्री रागिणी द्विवेदी, संजना गलराणी, पार्टी संयोजक वीरन खन्ना, आरटीओ लिपिक बी. के. रविशंकर आणि इतर अनेकांना ड्रग्ज घेताना किंवा पेडलिंग केल्याबद्दल अटक केली आहे. हे सर्व सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.