ऑनलाईन टीम / मुंबई :
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सकाळी वरळी मतदारसंघातील विकासकामांची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांनी स्वत: त्या वाहनाचे सारस्थ केले. पवार-ठाकरे यांच्या या दौऱ्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरे यांनी मुंबईत वेगवेगळ्या प्रकल्पांच्या उद्घाटनाचा धडाका लावला आहे. आज सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आदित्य ठाकरे यांनी वरळी, महालक्ष्मी परिसरातील विकासकामांची पाहणी केली. अजित पवार यांनी या भागांमधील झोपडपट्टय़ांची रचना, तेथील समस्या आणि एकंदरित परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. विशेष म्हणजे या दौऱ्यादरम्यान वाहनाचे सारथ्य आदित्य ठाकरे करत होते. त्यांच्या शेजारील सीटवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बसले होते. या दोन्ही नेत्यांनी आज ज्या भागाची पाहणी केली, तो वरळी, महालक्ष्मी आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्रपणे लढणार, या चर्चेने जोर धरायला सुरुवात केली. मात्र, अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना इतक्यात राजकीय अर्थ काढण्याची घाई करु नका, असे स्पष्ट केले.