‘सीएए’सह विविध मुद्यांवर चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शिवसेना युवानेते व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकार स्थापनेनंतर प्रथमच दोघा नेत्यांमध्ये भेट झाली. या वेळी विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधात दिल्लीत विरोधी पक्षांच्या बैठकीला शिवसेनेच्या खासदार गैरहजर राहिले होते. या पार्श्वभूमीवरही या बैठकीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची भेट अनौपचारिक होती, असे सेनेच्या नेत्यांनी सांगितले. मात्र, दोन्ही नेत्यांमधील 30 मिनिटांच्या भेटीत सद्यस्थितीतील राजकीय परिस्थिती, महाराष्ट्रातील पर्यावरण आणि पर्यटनाबाबचे मुद्दे तसेच, नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) याबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचीही भेट घेतली. या वेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांमधील समन्वय अधिक प्रभावी कसा करता येईल, यावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. सोमवारी सोनिया गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सीएए’च्या मुद्यावर विरोधी पक्षांची बैठक झाली होती. या बैठकीकडे शिवसेनेच्या खासदारांनी पाठ फिरवली होती. हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता. संवादा अभावी शिवसेनेचा प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहू शकला नाही, असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता.