मुंबई
आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेल लिमिटेडला ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीत 58 कोटी रुपये इतका एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ग्राहकांच्या खरेदीमध्ये वाढ झाली असल्याकारणाने सदरचा नफा झाल्याचे दिसून आले आहे. वर्षामागे समान कालावधीत कंपनीला 38 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. याआधीच्या म्हणजे जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा 188 कोटींवर होता. वर्षाच्या तुलनेमध्ये कंपनीचा महसूल डिसेंबर तिमाहीअखेर 20 टक्क्मयांनी घसरून 2076 कोटी रुपयांवर आला आहे. सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेमध्ये महसूल दुप्पट झाला असल्याचे कंपनीने सांगितले. ग्राहकांनी प्रत्यक्ष खरेदीवर आणि ऑनलाईन खरेदीवर गेल्या काही कालावधीत जोर दिला असल्याचे कंपनीने सांगितले. येणाऱया काळामध्ये कंपनी अधिक गतीने कार्यरत होईल व विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करेल, असे कंपनीच्यावतीने सांगण्यात येते. कंपनीच्या खर्चातही 28 टक्के घट झाली आहे.