रुपा पवारने दहावीत सेमी इंग्लिश घेऊन मिळविले 84 टक्के
- कातकरी आदिवासींमध्ये शिक्षणात उत्तुंग यश मिळविणारी पहिली मुलगी
- नाग्या म्हादू विद्यार्थी वसतिगृहाने दाखवला यशाचा मार्ग
- रुपा हिर्लोक हायस्कूलची विद्यार्थिनी
- खूप शिकून आयुष्य घडवायचंय…
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
नारुरच्या आदिवासी पाडय़ावर त्या दिवशी खरा जल्लोष झाला. कातकरी आदिवासींच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद व्हावी, अशी ही घटना होती. त्याचे कारणही तसेच होते. शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या या आदिवासी पाडय़ावरील रुपा पवार या मुलीने सेमी इंग्लिशमधून दहावीची परीक्षा देत तब्बल 84 टक्के गुण मिळविले. खरतर कातकऱयांच्या रितीनुसार लग्न होऊन, दारुडय़ा नवऱयाच्या लाथा-बुक्क्या खात, पोर-बाळं सांभाळायचं हे तिचं वय. परंतु आदिवासींच्या उत्थानासाठी झटणाऱया नाग्या म्हादू आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाने तिला आपल्या पदराखाली घेत यशाचा मार्ग दाखवला आणि हा चमत्कार घडला. आदिवासींमधील खरी गुणवत्ता बाहेर आली. रानावनात भटकणाऱया आदिवासींच्या या पोरीने चमत्कार घडवला.
कुडाळ तालुक्यातील नारुरच्या आदिवासी पाडय़ावर राहणारी रुपा शिवाजी पवार या मुलीने मिळविलेले हे यश शंभर टक्क्यांपेक्षाही अधिक आहेच. त्याचबरोबर ते ऐतिहासिकही आहे. पूर्णत: दारुच्या आहारी गेलेले रुपाचे आई-बाबा. आदिवासींच्या बाबतीत ही गोष्ट काही नवी नाही. त्यात रुपाच्या पाठची आणखी तीन भावंडे. घरात अठरा विश्व दारिद्रय़. लगतच्या गावात मोलमजुरी करून मिळणाऱया पैशातून दारू ढोसायची आणि त्यातून शिल्लक राहणाऱया पैशातून पोरांना जगवण्यासाठी दोन-चार घासाची व्यवस्था करायची, हेच रुपाच्या कुटुंबाचे जीवन. सायंकाळी घरी आल्यावर आई-बाबांचा दारू पिऊन धिंगाणा, हाणामारी, पोरांना मारबडव. रुपाला हे नित्याचेच होते. त्यामुळे ती आपल्या भावंडांची आई बनली होती. आई-बाबा मोलमजुरीसाठी बाहेर असत. रुपा सकाळी लवकर उठून घरातील भावंडांचं, आई-बाबांचं जेवण बनवून लगबगीने शाळेत जाई. जवळच्या हिर्लोक गावातील शिवाजी विद्यालयात ती शिकत असे. या हायस्कूलनेदेखील तिच्या शिक्षणाकडे व्यवस्थित लक्ष पुरविला होता.
नाग्या म्हादू वसतिगृहाने दाखवला यशाचा मार्ग
रुपा जेव्हा दहावीत गेली, तेव्हा आई-बाबांची भांडणं, घरातील जेवण, धुणी-भांडी, भावंडांची देखभाल या व्यापात तिला अभ्यासासाठी वेळ अपुरा पडू लागला. तिने आपली ही व्यथा नाग्या म्हादू आदिवासी वसतिगृहाचे संस्थापक उदय आईर यांच्यासमोर बोलून दाखविली. तिची तळमळ पाहून आईर यांनी रुपाच्या बाबांची समजूत काढत रुपा व तिच्या मागच्या एका बहिणीला वेताळबांबार्डे येथील वसतिगृहात आणलं आणि तिथेच रुपाच्या अभ्यासाला नवी दिशा प्राप्त झाली. उदय आईर यांची पत्नी उजा यांनी रुपाच्या गणित व इंग्रजी या विषयावर तिला खूप मार्गदर्शन केले. तिनेदेखील खूप अभ्यास केला. या वसतिगृहातून तिला मोटरसायकलने वा बसने शाळेत सोडले जायचे. वसतिगृहातून डबा दिला जायचा. तिला आवश्यक पुस्तके दिली जायची. थोडक्यात अभ्यासासाठी तिला पूर्ण वेळ दिला गेला आणि या सर्वांचे सोने करत रुपाने दहावीत 84 टक्के गुण मिळवत नवा इतिहास घडविला.
केवळ अभ्यासातच नव्हे तर रुपाने क्रीडाक्षेत्रातही राज्यस्तरापर्यंत झेप घेतली. रुपाच्या या यशात तिच्या हिर्लोक हायस्कूलचा व तिला मार्गदर्शन करणाऱया शिक्षकांचा वाटा आहेच. त्याचबरोबर नाग्या म्हादू आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाने तिला केलेले मार्गदर्शन व दिलेली साथ यामुळेच रुपा हे यश मिळवू शकली. रुपाच्या या यशाने आदिवासी मुलींना यशाचा नवा मार्ग सापडलाय. सिंधुदुर्गातील आदिवासी वसत्यांमधील अशी जवळपास 42 मुले सध्या वेताळबांबार्डेच्या या नाग्या म्हादू आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात शिकत आहेत.
शिकून नवीन आयुष्य घडवायचंय
रुपालादेखील आता नवा हुरुप आलाय. तिलादेखील आता खूप शिकून चांगलं आयुष्य घडवायचंय. यापुढे विज्ञान शाखेतून ती आपलं पुढील शिक्षण सुरू ठेवणार आहे. यशाबद्दल बोलतांना तिने नाग्या म्हादू आदिवासी विद्यार्थी वसतिगृह, मार्गदर्शन उदय आईर, उजा आईर, हिर्लोक हायस्कूलचे आभार मानले. रुपा सध्या गावात मोलमजुरीबरोबरच आदिवासी पाडय़ावरील मुलांना शिकवतेय. तिचे हे यश शंभर टक्क्यांपेक्षाही अधिक आहे.
उज्ज्वला निकमचे यश
रुपाच्या पावलावर पाऊल टाकत याच आदिवासी पाडय़ावरील उज्ज्वला कृष्णा निकम हिने दहावीत 66 टक्के गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी नोंदविली. तीदेखील नाग्या म्हादू वसतिगृहात मार्गदर्शन घेत होती. ती हिर्लोक हायस्कूलची विद्यार्थिनी.
(प्रतिक्रियांसाठी संयोजकांचा भ्रमणध्वनी -9422632756)