नवी मुंबई \ ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. नारायण राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात नारायण राणे यांनी आज माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे हे मला माहिती नाही असे सांगितले. तसेच माझ्याविरोधात आदेश काढायला तो काय राष्ट्रपती आहे काय असा टोला त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांना लगावला आहे.
नारायण राणे यांना अटकेच्या आदेशासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “माहितीच्या आधारे मी उत्तर देणार नाही. गुन्हा दाखल झाल्याची माझ्याकडे माहिती नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पाहा. नाहीतर टीव्ही चॅनेल्सविरोधात मी गुन्हा दाखल करणार. गुन्हा नसताना पथक निघालं, अटक होणार सांगितलं जात आहे. मी काय साधा माणूस वाटलो का?,” अशी विचारणा नारायण राणे यांनी केली. माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन असा इशारा यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना दिला.
“आम्ही समर्थ आहोत. दोन दगड मारुन गेले असतील तर त्यात पुरुषार्थ नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी नाशिकमधील तोडफोडीच्या घटनेवर दिली. “ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थोबाड फोडण्याचं वक्तव्य केलं होतं तेव्हा तो गुन्हा नव्हता का? मग त्यावेळी गुन्हा दाखल का झाला नाही?,” अशी विचारणा नारायण राणेंनी केली.
देशाचा अमृतमहोत्सव माहिती नसणं हा देशाचा अपमान, राष्ट्रद्रोह आहे अशी टीका करताना नारायण राणे यांनी मी असतो तर… ऐवजी आत्ता कानफाड फोडेन असं म्हणालो असतो तर तो गुन्हा ठरला असता असा युक्तिवाद केला. मी या देशाचा केंद्रीय मंत्री आहे. काय चेष्टा लावली आहे असंही यावेळी ते म्हणाले.
“पोलीस आयुक्त काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान?”
आम्ही नागरिक आहोत, बॅनरबाजी करु. मी तुम्हाला मीडियाला उत्तर देण्यास बांधिल नाही. कोण शिवसेना, समोर उभं तरी राहावं.. नाशिक पोलीस आयुक्त काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे आदेश काढायला. मी बोललो ते क्रिमिनल ऑफेन्स नाहीच. तपासून पाहावं. आमचं पण सरकार वर आहे, बघतो हे किती उड्या मारतात ते. ठरल्याप्रमाणे यात्रा होणार, असंही राणेंनी स्पष्ट केलं.