दोन हेल्मेट सक्तीचा सर्वसामान्यांना जाच : दंडाच्या भितीने लिफ्टही मिळेना
प्रतिनिधी / फोंडा
प्रवासी बसेस सुरु झाल्या तरी त्या वेळेत मिळत नाहीत. कामावर नाही गेलो तर पगार मिळण्याची शाश्वती नाही. शिवाय कामावरून काढून टाकण्याची भिती, अशा विवंचनेत सापडलेला सर्वसामान्य कामगारवर्ग लॉकडाऊन शिथील केल्याने घराबाहेर पडला आहे. पण आता त्याने धसका घेतला आहे, तो रस्त्यावर थांबून विनाहेल्मेटसाठी तालांव देणाऱया पोलिसांचा.
फोंडा शहरातील विविध नाक्यांवर थांबणारे पोलीस आंता दुचाकीचालकांबरोबरच मागे बसणाऱया व्यक्तीला हेल्मेट सक्तीचे असल्याच्या नियमावर अडून बसले आहेत. गेल्या दोन तीन दिवसांमध्ये अशा काही दुचाकीचालकांना तांलाव तर काहींना समज देण्यात आला आहे. आधीच कोरोनाच्या संकटामुळे पिचलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता पोलिसांच्या या जबरी तालांवामुळे कामावर जाणे कठिण बनले आहे. दुचाकीवरील दोन्ही स्वारांना हेल्मेट कायद्याने लागू आहे. मात्र लॉकडाऊनसारख्या अडचणीच्या व आणीबाणीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांवर या नियमाची कितपत सक्ती लादायची याचे भान असणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
सर्वसामान्य कामगारांना कामावर जाण्यात अडचण
फोंडा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक महिला व पुरुष कुंडई, बेतोडा, मडकई व इतर औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला जातात. याशिवाय फोंडा शहरातील विविध खासगी आस्थापने, कपडय़ाची दुकाने, गोवा बागायतदार किंवा अन्य आस्थापनामध्ये तुटपुंज्या पगारावर काम करून उदरनिर्वाह चालवणाऱयांची संख्याही मोठी आहे. अशा लोकांनी लॉकडाऊनचा साधारण दीड महिना घरात बसून काढला. अजून लॉकडाऊन कितीकाळ वाढणार याची शाश्वती नाही. घरात बसून कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार नाही, या चिंतेने ग्रासलेले अनेक कुटुंब प्रमुख आता कामानिमित्त घराबाहेर पडू लागले आहेत. यापैकी बऱयाच जणांकडे स्वतःची दुचाकी नाही. त्यांचा नियमित प्रवास हा बस वाहतुकीवरच अवलंबून आहे. सध्या बस वाहतूक सुरु असली तरी फोंडय़ातील ग्रामीण भागातून शहराकडे येण्यासाठी बसेस सुरु झालेल्या नाहीत. काही भागात सुरु झाल्या तरी त्या वेळेत मिळत नाहीत. अशा परिस्थितीत या कामगारांना दुचाकी असलेल्या आपल्या शेजाऱयाकडे किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडे लिफ्ट मागून कामावर जावे लागते. शिवाय संचारबंदीमुळे सायंकाळी ‘सातच्या आत घरात’ पोचण्याची घाई असते. दुचाकीवरील दोन्ही स्वारांनी हेल्मेट न घातल्यास वाटेत थांबणारे पोलीस दंड ठोठावत असल्याने आता त्यांना कुणी लिफ्टही देऊ पाहत नाही. अशावेळी कामावर जायचे कसे व कुटुंबाचा उदरनिर्वाह तरी कसा चालवायचा या विवंचनेत सर्वसामान्य नागरिक सापडला आहे.
महिलावर्गालाही दोन हेल्मेटचा फटका
दोन हेल्मेटचा फटका महिलावर्गालाही बसू लागला आहे. कुटुंबाला आधार म्हणून बऱयाच महिला छोटे मोठे कारखाने, औषधालये किंवा विविध आस्थापनामध्ये कामाला जातात. अशा महिलांना आपल्या कामाच्या ठिकाणी स्कूटरवरून यायचे असल्यास स्वतः वेगळे हेल्मेट बाळगावे लागत आहे. कुणी ओळखीचा भेटला तरी दंडाचा भुर्दंड त्या दुचाकीचालकाला होण्याची भिती. अशा परिस्थितीत एक तर काम सोडून घरी बसायचे किंवा हेल्मेट तरी बाळगायचे याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नाही. फोंडय़ातील विविध सरकारी कचेऱयामध्ये येणाऱया महिला वर्गांचीही हीच स्थिती आहे. यापैकी बऱयाचजणांना दुचाकी चालवता येत नाही. वेळेत बसेस उपलब्ध नसल्याने कामावर पोचण्यासाठी अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागत आहे.
येत्या 21 मे पासून दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे. परीक्षेच्या काळात मुलांना परीक्षा केंद्रापर्यंत सोडण्यासाठी अनेक पालकांना स्वतःच्या दुचाकी घेऊन जावे लागणार आहे. या विद्यार्थ्यांनाही हेल्मेट सक्तीने सोबत बाळगावे लागल्यास डोक्यातील परीक्षेच्या ताणाबरोबरच हेल्मेट बाळगण्याचा ताणही वाढणार आहे. एका घरात एक दुचाकी व चार लोक असल्यास प्रत्येकाला वेगवेगळे हेल्मेट घ्यावे लागणार व अन्यथा संसर्ग वाढण्याचा तेवढाच धोका आहे. लॉकडाऊनच्या काळात महिनाभर बेकार राहिलेल्या मोटारसायकल पायलट नुकतेच कुठे स्टेंडवर दिसू लागे आहेत. सरकारने त्यांना हेल्मेटपासून थोडी सवलत दिली तरी, त्यांचा व्यावसाय दोन हेल्मेटच्या सक्तीमुळे अडचणित येऊ शकतो.