म्यानमारच्या सैन्याचा क्रूर प्रताप
फेब्रुवारी महिन्यात सत्तापालट झाल्यापासूनच म्यानमारमध्ये जबरदस्त तणावाची स्थिती आहे. लोकशाहीच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱया शेकडो लोकांना म्यानमारच्या सैन्याने ठार केले आहे. आता याप्रकरणी एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. म्यानमारचे सैन्य निदर्शकांना मारल्यावर त्यांचे मृतदेह संबंधितांच्या कुटुंबीयांना सोपविण्यासाठी 85 डॉलर्स म्हणजेच सुमारे 6 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम वसूल करत आहे. म्यानमारचे लोक अनेक समस्या असूनही सातत्याने निदर्शने करत आहेत.
बागो शहरात 82 निदर्शकांना सैन्याने ठार केले आहे. बागो विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने फेसबुकवर एका पोस्टच्या मदतीने या भागातील माहिती जगासमोर मांडली आहे. म्यानमारचे सैन्य 120 हजार म्यानमार क्यात म्हणजेच 6 हजार रुपये मृतदेह प्राप्त करू इच्छिणाऱया कुटुंबीयांकडून उक्कळत असल्याचे यात नमूद आहे.
निदर्शकांवर अंत्यसंस्कार सुरु असतानाही सैन्याने त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत बेछूट गोळीबार तसेच ग्रेनेड्सही फेकले आहेत. म्यानमारच्या सैन्याच्या कारवाईवरून जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. जर्मनी, ब्रिटन आणि अमेरिकेसारख्या देशांसह संयुक्त राष्ट्रसंघ महासचिवांनीही चिंता व्यक्त केली आहेत. फेब्रुवारीपासून आतापर्यंत 700 हून अधिक निदर्शक मारले गेले आहेत.