तत्काळ सुरु न केल्यास आंदोलन-आमदार शिवेंद्रसिंहराजे
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातील वाहतुकीचा बोजवारा कमी करण्यासाठी निर्माण केलेल्या ग्रेड सेपरेटरचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. परंतु तरीही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनाचा घाट असल्यामुळे ग्रेड सेपरेटर सुरू करण्यास मुद्दामहून दिरंगाई केली जात आहे. यावर ‘तरुण भारत’ने आवाज उठवला होता. याची दखल घेत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी ग्रेडसेपरेटर तत्काळ सुरू करा, अन्यथा आंदोलन करणार असा गंभीर इशारा प्रशासनाला दिला आहे.
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, पोवई नाका येथील ग्रेडसेपरेटरचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. राजवाडा- पोवई नाका ते मध्यवर्ती बसस्थानक, पोवईनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरील ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाले आहे. पोवई नाका ते वायसी कॉलेज या मार्गावरील काम प्रगतीपथावर आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झालेले रस्ते वाहतुकीसाठी खुले करणे अत्यावश्यक आहे. उद्घाटनाचा कार्यक्रम ज्यावेळी घ्यायचा असेल त्यावेळी घ्या आणि ज्यांच्या हस्ते घ्यायचा असेल त्यांच्या हस्ते घ्या. मात्र त्यासाठी वाहनचालक आणि नागरिकांची कुचंबना करु नका. येत्या आठवडाभरात ग्रेड सेपरेटरमधील पूर्ण झालेल्या मार्गावरुन वाहतूक सुरु करा अन्यथा स्वत: बॅरेकेटस काढून आंदोलन करु आणि वाहतूक सुरु करु, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाला दिला आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, साताऱयातील सर्व प्रकारची कार्यालये, शाळा, महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. यामुळे सातारा शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडत आहेत. बांधकाम विभागाकडून गेड सेपरेटरच्या आजूबाजूच्या रस्त्यांचे डांबरीकरण सुरु आहे. केवळ आजूबाजूच्या रस्त्यांचे डांबरीकरण करुन चालणार नाही तर, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी तत्काळ खुला करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीला ग्रेड सेपरेटर म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. पोवई नाका हे शहराचे मुख्य ठिकाण आहे. सर्व प्रकारची कार्यालये, शाळा, महाविद्यालये, दुकाने आणि बाजारपेठा सुरु झाल्याने सातारा शहरातील रस्त्यांवर वाहनांची गर्दी होत आहे. ग्रेड सेपरेटरमधून वाहतूक सुरु नसल्याने या रस्त्यांवर वाहतुकीचा ताण पडत आहे. गेले कित्येक वर्षांपासून ग्रेड सेपरेटरची फक्त चर्चा सुरु आहे. मात्र ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी कधी खुला होणार असा संतप्त सवाल आता उपस्थित होवू लागला आहे. सध्या सातारकरांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. ग्रेड सेपरेटरमधील ज्या मार्गांचे काम पूर्ण झाले आहे ते मार्ग खुले केल्यास वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. केवळ उद्घाटनासाठी ग्रेड सेपरेटर खुला न करणे हे अनाकलनीय कोडे आहे. ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन जेव्हा करायचे असेल तेव्हा सवडीने आणि आवडीने करा पण, त्यासाठी वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय करु नका. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने निर्णय घेवून येत्या आठ दिवसांत ग्रेड सेपरेटरमधील काम पूर्ण झालेले मार्ग खुले करावेत अन्यथा लोकहितासाठी मला स्वत: ग्रेड सेपरेटरला लावलेले बॅरेकेटस काढून रस्ता सुरु करण्याचे आंदोलन करावे लागेल असा गंभीर इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.