मुरगाव पालिका कामगारांचे आंदोलन : ठोस आश्वासनानंतर कामाला सुरवात
प्रतिनिधी / वास्को
मुरगाव नगर पालिकेच्या कामगारांनी वेतन मिळाले नसल्याच्या निषेधार्थ काम बंद ठेवून सर्वानाच वेठीस धरले. त्यामुळे नगरसेवक व पालिका अधिकाऱयांमध्ये खळबळ उडाली. प्रथम नगराध्यक्ष व नंतर मुख्याधिकाऱयांनी या प्रश्नात हस्तक्षेप करून कामगार वर्गाला समजावण्याचा प्रयत्न केला. येत्या शुक्रवारपर्यंत कामगारांना वेतन पुरवण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱयांनी दिल्यानंतर त्यांनी कामाला सुरवात केली.
नियमानुसार या कामगारांना महिन्याच्या पहिल्या किंवा शेवटच्या दिवशी वेतन मिळते. मात्र, या महिन्याचा अकरावा दिवस उजाडला तरी वेतन मिळाले नाही. त्यामुळे या कामगारांमध्ये गेले काही दिवस असंतोष पसरला होता. त्यातूनच सोमवारी काम बंद ठेवून हा असंतोष त्यांनी व्यक्त केला. तसेच वेतन मिळत नाही वा ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्धार या कामगारांनी केला. या आंदोलनामुळे सकाळी सात वाजता सुरू होणारी सफाईची कामे तशीच राहिली. कामगारांच्या या भूमिकेमुळे संपूर्ण पालिका क्षेत्रच वेठीस धरले जाणार या भीतीमुळे काही नगरसेवक व नगराध्यक्षांनी कामगारांशी चर्चा करून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, कामगार आपल्या निर्धारावर ठाम राहिले.
शेवटी दहाच्या सुमारास नंदादीप राऊत व मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी या कामगारांसमवेत पालिका सभागृहात बैठक घेतली. त्यानुसार येत्या शुक्रवारपर्यंत वेतन देण्याचे मुख्याधिकाऱयांनी मान्य केले. त्यानंतर कामगारांनी काम प्रारंभ केले.
कामगार संघटनेचे सरचिटणीस वासुदेव धावडे यांनी या चर्चेत मध्यस्थी केली. करोनाची पर्वा न करता कामगारांनी जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावले. तरीही त्यांना वेतन मिळालेले नाही. पूर्वी कामगारांना एक तारखेपर्यंत वेतन मिळत होते. त्यात मागच्या चार पाच महिन्यांपासून अनियमितपणा आल्याने कामगारात नाराजी पसरल्याचे धावडे यांनी सांगितले. या महिन्याचे दहा दिवस उलटले तरी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न कुणी गांभिर्याने घेतला नाही. त्यामुळे काम बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला अशी माहिती त्यांनी दिली. कामगारांना वेतन वितरीत करण्यास दिरंगाई झाल्यासंबंधी बोलताना नगराध्यक्ष नंदादीप राऊत म्हणाली की, मुरगाव पालिकेची आर्थिक स्थिती आधीच खालावली होती. त्यातच लॉकडाऊनच्या काळामुळे पालिकेचा महसुलही थांबला. सुमारे दोन कोटी रूपये आले नाहीत. सरकारकडून मिळणारा वेतन निधीही सरकार दरबारीच अडकलेला आहे. त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण झालेली आहे. मुरगाव पालिका ही अ दर्जाची पालिका असून ती स्वताच्या महसुलावर कार्य करू शकते. मात्र, पालिकेचे अनेक प्रश्न असून ते न्यायप्रविष्ठ आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने मदत केली तर मुरगाव पालिकेसमोर आर्थिक अडचण उभी राहणार नाही असे सांगून पालिका कामगारांना भविष्यात वेतनाची समस्या जाणवणार नाही याची काळजी घेणार असल्याचेही स्पष्ट केले.