ऑनलाईन टीम / मॉस्को :
‘एके-47 203’ या अत्याधुनिक रायफलींसाठी भारत आणि रशिया यांच्यातील करारावर अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे. एके-47 203 ही एके-47 रायफल्सची सर्वात प्रगत आवृत्ती आहे. आता इंडियन स्मॉल आर्म्स सिस्टीम (इन्सा) असॉल्ट रायफलची जागा घेईल.
स्को (शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन) शिखर परिषदेदरम्यान हा करार मान्य करण्यात आला. या परिषदेसाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. भारत-रशियातील या करारामुळे भारतीय लष्कराच्या हाती एके-47 203 या मारक क्षमतेत अत्यंत प्रभावी असणाऱ्या रायफली येणार आहेत.
भारतीय लष्कराला 7 लाख 70 हजार एके-47 203 रायफली हव्या आहेत. त्यामधील 1 लाख रायफली रशियाकडून पुरवल्या जातील. इतर रायफलींचे उत्पादन भारतातच केले जाईल. उत्तर प्रदेशातील अमेठी येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत 7.62 × 39 एमएम रायफलची निर्मिती करण्यात येणार आहे. या रायफलची किंमत 1100 अमेरिकन डॉलर (अंदाजे 81,000 रुपये) असेल. यामध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स बसवण्याच्या खर्चाचा समावेश असेल. सध्या भारतीय लष्कर 1996 च्या इन्सास रायफलींचा वापर करत आहे.