हंगेरीच्या पीटर लेकोने मिळविला विजय, कार्लसन, क्रॅमनिक, गिरी विजयी
वृत्तसंस्था/ चेन्नई
माजी वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदला लेजेंड्स ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. चुरशीच्या लढतीत हंगेरीच्या पीटर लेकोने त्याला या फेरीत हरविले.
आनंदने चमकदार सुरुवात करताना चारपैकी पहिला डाव जिंकून आघाडी घेतली. त्यानंतरचे दोन डाव बरोबरीत राहिले तर चौथा डाव जिंकून लेकोने आनंदशी बरोबरी साधली. त्यानंतर झालेल्या आर्मागेडॉन (टायब्रेकर) लढतीत लेकोने बाजी मारत आनंदला विजयापासून वंचित ठेवले. आनंदला अद्याप एकही गुण मिळविता आला नसल्याने तो तळाच्या स्थानावर आहे. मॅग्नस कार्लसन चेस टूरमध्ये आनंद पहिल्यांदाच सहभागी झाला असून याआधीच्या फेऱयांत त्याला पीटर स्विडलर, कार्लसन, क्रॅमनिक व अनिश गिरी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. पाचव्या फेरीत जागतिक अग्रमानांकित व वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनने झुंजार खेळ करीत पराभव टाळण्यात यश मिळविले. त्याने अनुभवी व्हॅसील इव्हान्चुकवर 3-2 अशी मात केली.
लेजेंड्स बुद्धिबळ स्पर्धा अनोखी स्पर्धा असून कार्लसन टूरचा भाग असलेल्या चेसेबल मास्टर्स स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेल्या कार्लसन, लिरेन, नेपोमनियाची, गिरी यांना त्यात थेट स्थान मिळाले आहे. त्यांना या स्पर्धेत 40-52 वयोगटातील सहा वयस्कर खेळाडूंशी मुकाबला करावा लागत आहे. या स्पर्धेतील विजेता ग्रँड फायनलसाठी पात्र ठरणार असून 3 लाख डॉलर्स बक्षीस असलेली फायनल स्पर्धा 9 ते 20 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.
पाचव्या फेरीचे निकाल : पीटर लेको वि.वि. आनंद 3-2, कार्लसन वि.वि. इव्हान्चुक 3-2, क्रॅमनिक वि.वि. डिंग लिरेन 2.5-1.5, गिरी वि.वि. बोरिस गेलफँड 2.5-1.5, नेपोमनियाची वि.वि. पीटर स्विडलर 3-1.