स्टॅव्हेन्जर-नॉर्वे / वृत्तसंस्था
भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत अझरबैजानच्या तैमूर रॅझबोव्हला नमवले. विद्यमान जगज्जेता कार्लसन गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान असून आनंद दुसऱया स्थानी आहे. आनंद-रॅझबोव्ह यांची लढत 42 चालीनंतर बरोबरीत सुटल्यानंतर आर्मागेडॉनचा अवलंब केला गेला. त्यात आनंदने 25 चालीत बाजी मारली. अझरबैजानच्या मेमेद्यारोव्हने अनिश गिरीला हरवले तर लॅग्राव्हेने अमेरिकेच्या वेस्ले सो याला पराभवाचा धक्का दिला. अन्य लढतीत चीनच्या हाओ वांगने व्हॅसेलिन टोपालोव्हला नमवले तर कार्लसनला त्याचाच देशवासी आर्यन तारीने पराभवाचा धक्का दिला.