जि.प. महिला व बालकल्याण विभागामार्फत 89 अंगणवाडय़ांचे पालटलेय रुपडे
प्रतिनिधी/ रत्नागिरी
इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचा अंगणवाडय़ांचे ‘रूप’ बदलण्यासाठी सुरू झालेल्या कार्यवाहीला यश आले. जिल्हय़ातील 89 अंगणवाडय़ा आता ‘आनंदवाडय़ा’ (स्मार्ट) बनल्या आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे जाणारे विद्यार्थी पुन्हा मराठी शाळेत यावेत, यासाठी अंगणवाडय़ांची सुधारणा केली जात असल्याची माहिती जिल्हा परिषद महिला बालविकास अधिकारी नयना इंगवले यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचा अंगणवाडय़ांचे ‘रूप’ बदलण्यासाठी कार्यवाही हाती घेण्यात आली. त्यावेळी अंगणवाडय़ांची नुसतीच रंगरंगोटी करण्याऐवजी ‘मुलांना अंगणवाडीत यावेसे वाटावे व पालकांनाही मुलांना पाठवावेसे वाटावे’ ही संकल्पना ठेवून अंगणवाडय़ांचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे महिला व बालकल्याण विभागामार्फत सांगण्यात आले. या अंतर्गत एलईडी टीव्ही, सोलर लाइटींग सिस्टीम, ई-लर्निंग सॉफ्टवेअर, स्वच्छ भारत किट, वॉटर प्युरिफायर, हॅंडवॉश बेसिन, एज्युकेशनल पेंटिंग चार्टस आदी साहित्य दिले जात आहे. तसेच अंगणवाडी केंद्राची किरकोळ डागडुजी व दुरुस्तीही करण्यात आली आहे, असे नयना इंगवले यांनी सांगितले.
जिह्यात प्रायोगिक टप्प्यात 89 अंगणवाडय़ा ‘स्मार्ट’ बनल्याचे सांगण्यात आले आहे. पूर्वी अंगणवाडय़ांमध्ये ‘बोलक्या भिंती’ नव्हत्या, अंगणवाडीच्या मुलांना ड्रेस नव्हते, शाळेत बसायला बाक नव्हते. पण आता आदर्श अंगणवाडीमध्ये आदर्श क्लासरूम होण्यासाठी ‘बोलक्या भिंती’ केल्या आहेत. मुलांना सण सांगणे, पाळीव प्राण्यांची ओळख करून देणे, फुलांची ओळख करून देण्यासाठी शाळांमध्ये रंगरंगोटी करून घेतली आहे. टीव्ही, डीव्हीडीचा वापर काही शाळांमध्ये लोकसहभागातून टीव्ही व डीव्हीडी दिले आहेत. टीव्हीमध्ये गाणी-गोष्टी पाहून शिकता यावे, यासाठी त्याचा उपयोग होत आहे. ही आदर्श अंगणवाडीची संकल्पना असल्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जशा सोयीसुविधा असतात, तशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असे इंगवले यांनी सांगितले.
आपला पाल्य चांगल्या शाळेत शिकावा, अशी पालकांची धारणा आहे. त्यामुळे प्रत्येकजण मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकू लागला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे जणारी ही मुले पुन्हा मराठी माध्यमाच्या अंगणवाडय़ांमध्ये यावीत, यासाठी अंगणवाडय़ांमध्ये सुधारणा करणे आवश्यक होते. म्हणून जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीतील मुलांना हसत-खेळत शिक्षण मिळावे, बागडता यावे, खेळातून अभ्यास व्हावा, यासाठी बोलक्या अंगणवाडय़ा तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिह्यातील अंगणवाडय़ांचे चित्र बदलले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या घटत्या पटसंख्येच्या पार्श्वभूमीवर या शाळांचा पाया असलेल्या अंगणवाडय़ाच लोकसहभागातून सक्षम करण्याचा हा प्रयत्न आहे. अंगणवाडीत मुलांना हसत-खेळत शिकता यावे, पालकांना आपले मूल इथेच शिकावे असे वाटावे, या दृष्टीने महिला व बालकल्याण विभाग पुढाकार घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हय़ातील प्रायोगिक टप्प्यात स्मार्ट झालेल्या अंगणवाडय़ांची आकडेवारीः
मंडणगड-6,
दापोली-12
खेड- 11
चिपळूण- 13
गुहागर- 8
संगमेश्वर- 13
रत्नागिरी- 15
लांजा- 8
राजापूर- 3