घराचा पाठीमागील दरवाजा फोडून दीड लाखाचा ऐवज पळविला
प्रतिनिधी /बेळगाव
आनंदनगर-वडगाव येथील एका बंद घराचा पाठीमागील दरवाजा फोडून चोरटय़ांनी सुमारे दीड लाखाचा ऐवज पळविला आहे. मंगळवारी सायंकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
दुसरा क्रॉस, आनंदनगर-वडगाव येथील गीता रामकृष्ण मिरजकर यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. गीता या कणबर्गी येथील सरकारी हायस्कूलमध्ये क्लार्क म्हणून काम करतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास त्या आपल्या घराला कुलूप लावून कामावर गेल्या.
दागिने लांबविले
सायंकाळी 6.45 वाजता त्या घरी परतल्या. दर्शनी दरवाजाला लावलेला कुलूप उघडून गीता यांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरटय़ांनी पाठीमागील दरवाजा फोडून घरात प्रवेश केला आहे. तिजोरी फोडून कर्णफुले, अंगठी असे दोन तोळे सोने, एक किलो चांदीचे दागिने पळविले आहेत.
शहापूर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर पुढील तपास करीत आहेत. चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.