खातेवाटपाच्या मुद्दय़ावरून उद्भवलेली नाराजी दूर
प्रतिनिधी /बेंगळूर
आपल्याला वाटप झालेले खाते बदलून न दिल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा होस्पेटचे आमदार आनंदसिंग यांनी केली होती. अखेर त्यांची समजूत काढण्यात मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यशस्वी ठरले आहेत. बुधवारी रात्री उभय नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आनंदसिंग यांनी नरमाईची भूमिका घेतली. लवकरच भाजप हायकमांडशी चर्चा त्यांना खाते बदलून देण्यात येण्याची शक्यता आहे.
मागील आठवडय़ात नूतन मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले होते. आनंदसिंग यांना पर्यटन, पर्यावरण आणि जैवविज्ञान खाते देण्यात आले होते. मात्र त्यांनी, आपल्याला अपेक्षेप्रमाणे खाते देण्यात आलेले नाही. राज्यात भाजपला सत्ता मिळण्यात आपले योगदानही महत्त्वाचे आहे. आपल्याला खाते बदलून मिळाले नाही, तर मंत्रिपदाचा राजीनामा देईन, अशा इशारा त्यांनी दिला होता. मंगळवारी त्यांनी होस्पेटमधील आपल्या कार्यालयावरील फलक काढून नाराजी व्यक्त केली होती. तर बुधवारी सकाळी होस्पेटमधील वेणूगोपाल मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांनी आपल्या राजकारणाचा प्रारंभ आणि शेवट माहित नसल्याची प्रतिक्रिया दिली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री बोम्माई यांनी आनंदसिंग यांना बेंगळूरला बोलावून घेतले. रात्री दोन तास चर्चा केल्यानंतर आनंदसिंग यांची समजूत काढण्यात ते यशस्वी ठरले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आनंदसिंग यांनी, आपण खातेबदलाची मागणी केली होती. मात्र, राजीनाम्याविषयी कोठेही विधान केलेले नाही, असे सांगितले. तत्पूर्वी त्यांनी येडियुराप्पांची भेट घेऊन मागणी पूर्ण करण्याची विनंती केली. मात्र, येडियुराप्पांनी त्यांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून माघार घेण्याचा सल्ला दिला होता.