ऑनलाईन टीम / भोपाळ :
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी बुधवारी मध्यप्रदेशच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अजय कुमार मित्तल यांनी भोपाळ मधील राजभवनात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.
दरम्यान, मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांची तब्येत बिघडली असल्याने आनंदीबेन पटेल यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. टंडन यांच्यावर उत्तर प्रदेशातील लखनऊ मधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
त्यांच्यावर उपचार करत असलेल्या एका डॉक्टरांनी सांगितलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना ट्रेकोस्टाॅमी द्वारे क्रिटिकल केअर व्हेंटिलेटर सपोर्ट दिला जात आहे.
आनंदीबेन पटेल या आधी देखील मध्य प्रदेशच्या राज्यपाल होत्या. उत्तर प्रदेशात त्यांची राज्यपाल म्हणून निवड होण्यापूर्वी म्हणजेच 23 जानेवारी 2018 ते 28 जुलै 2019 पर्यंत त्या मध्य प्रदेशच्या राज्यपाल म्हणून काम करत होत्या.