आई पॅक करते भोजन – मुलगा पाकिटावर लिहितो संदेश
सोशल मीडियावर व्हायरल एका छायाचित्राने लोकांची मने जिंकून घेतली आहेत. एक महिला कोरोनाबाधितांसाठी भोजन तयार करते आणि तिचा मुलगा खाद्यपदार्थांच्या प्रत्येक पॅकिंगवर ‘आनंदी रहा’ असे लिहितो. या संकटकाळात हे छायाचित्र लोकांना आशा देण्यासह त्यांच्या चेहऱयावर आनंद निर्माण करणारे ठरले आहे. छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर लोक या मुलाला ‘चिमुकला देवदूत’ही म्हणू लागले आहेत.
या छायाचित्राला आतापर्यंत 13 हजारांहून अधिक लाइक्स आणि 2 हजारांहून अधिक रीट्विट्स मिळाले आहेत. या मुलाची आई लेडी हॉस्पिटलमध्ये दाखल गरोदर महिलांसाठी पौष्टिक आहार तयार करते आणि तिचा मुलगा त्या डब्यांवर आनंदी रहा असे लिहित असतो. या मुलाचे नाव अद्विक असून तो कोविड रिलीफ ब्रिगेडचा सर्वात छोटा स्वयंसेवक आहे. सोशल मीडियावर या मुलाचे आणि त्याच्या आईचे कौतुक होत आहे. मातापुत्राला लोक सलाम करत आहेत.