अभयकुमार करडी चषक क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
आनंद क्रिकेट अकादमी आयोजित अभयकुमार करडी स्मृती चषक 14 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत आनंद क्रिकेट अकादमी अ संघाने ब संघाचा 195 धावानं पराभव केला. 6 गडी बाद करणाऱया सुप्रित गेंजीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
भुतरामहट्टी येथील भगवान महावीर महाविद्यालयाच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात आनंद अकादमी अ संघाने 38 षटकात 7 बाद 256 धावा केल्या. त्यात ओम जकातीने 2 षटकार 9 चौकारासह नाबाद 75, निलेश रणसुबेने 2 षटकारासह 47, तर नील पवारने 3 चौकारासह 42 धावा केल्या. आनंद अकादमी ब तर्फे अथर्व करडीने 59 धावात 2, सुमेगने 63 धावात 2, आदित्य भंडारी व आयन मुल्ला यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमी ब संघाचा डाव 12.4 षटकात 61 धावात आटोपला. त्यात कार्तिक पाटीलने 19 तर हैदरअली सय्यदने 14 धावा केल्या. आनंद अकादमी अ तर्फे सुप्रित गेंजीने 7 धावात 6 गडी बाद करत निम्म्याहून अधिक संघ गारद केला. लक्ष वेर्णेकरने 3 धावात 2 तर तनिष्क जैनने 1 गडी बाद केला.