माजी वर्ल्ड चॅम्पियन ब्लादिमिर क्रॅमनिकला विश्वास
चेन्नई / वृत्तसंस्था
भारताचा पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद सध्या त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसला तरी अद्याप त्याच्यात बरेच बुद्धिबळ बाकी आहे असे माजी विश्व बुद्धिबळ चॅम्पियन ब्लादिमीर क्रॅमनिकने म्हटले आहे. 44 वर्षे क्रॅमनिक 2006 ते 2007 या कालावधीत निर्विवाद वर्ल्ड चॅम्पयिन राहिला असून 2008 मध्ये आनंदने जेतेपदावर काबीज केले होते
‘विश्वनाथन आनंद सध्या फॉर्ममध्ये नसेल. पण यापूर्वी त्याने जी उंची गाठली, ते पाहता, त्याचा सध्याचा फॉर्म फारसा लक्षवेधी नाही असे चित्र उभे राहिले शकते. मात्र मला यात फारसे तथ्य वाटत नाही’, असे रशियन ग्रँडमास्टर पॅमनिक म्हणाला. मंगळवारी येथे 14 युवा भारतीय बुद्धिबळपटू साठी अभिनव शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी क्रॅमनिक बोलत होता.
‘आनंद ज्या प्रकारे मार्गोत्क्रमण करत आहे, त्याप्रमाणे या वयात अव्वल दर्जाच्या खेळाडूंमध्ये समाविष्ट असणे हे सुद्धा खूप मोठे यश आहे आणि पुढील पिढीला ते शक्मय होईल का याबद्दल माझ्या मनात तरी साशंकता आहे’, असे निरीक्षण क्रॅमनिकने पुढे नोंदवले. पुढील काही वर्षात आनंद आणखी दर्जेदार कामगिरी करेल असा विश्वास त्याने याप्रसंगी व्यक्त केला विश्वनाथन आनंदने 2019 मध्ये 50 व्या वर्षात पदार्पण केले असून तूर्तास तरी तो फॉर्ममध्ये परतण्यासाठी झगडत आहे.
एखादा खेळाडू निवृत्त होणार का, याचे संकेत कशावरून मिळतात्। या प्रश्नावर तो म्हणाला हे बरेचसे ज्या-त्या खेळाडूवर अवलंबून असते. मात्र सातत्याने यश हुलकावणी देत असल्यास ही त्याची सुरुवात म्हणावी लागेल मी स्वतः व्यवसायिक खेळापेक्षा अन्य बाबी आजमावणार होतो म्हणून मी निवृत्ती स्वीकारली. पण, जे खेळाडू सातत्याने खेळत आले आहेत त्यांच्याबद्दल मला आदर आहे. वयाच्या चाळिसाव्या वर्षानंतर खेळत राहणे आणि विशेषतः युवा खेळाडूंचा सामना करणे आव्हानात्मक असते. पण मैदानी खेळाइतकी शारीरिक कसोटी लागत नसल्याने तितकी नाटय़मयता इथे कदाचित नसेल, असे क्रॅमनिक पुढे म्हणाला.
आणखी एक दिग्गज ग्रँडमास्टर बोरिस गेलफंड देखील या शिबिरात क्रॅमनिकच्या साथीने प्रशिक्षण देणार असून त्याने आनंदबद्दल प्रशंसोद्गार काढले. ‘2013 मध्ये संपन्न झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आनंदला मॅग्नस कार्लसन विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला त्यावेळी त्याला निवृत्तीचा सल्ला देण्यात आला होता. पण माझ्या मते अशी मागणी करणे वेडेपणाचे आहे. आनंद जोवर खेळाचा आनंद लुटत आहे तोवर त्याने चिंता करु नये’, असे गेलफँड येथे म्हणाला.
भारतीय बुद्धिबळात बरीच गुणवत्ता असून पुढील काही वर्षात अव्वल दहा खेळाडूंत बरेच भारतीय असतील, अशी मला अपेक्षा आहे, याचाही गेलफँडने उल्लेख केला. चेन्नईतील या 10 दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे मायक्रो सेन्स तंत्रज्ञान विषयक कंपनीने आयोजन केले आहे या शिबिरात प्रज्ञानंदा, डी. गुकेश, रौनक साधवाणी, प्रितू गुप्ता, पी. इनियन, अर्जुन इरिगेसी (सर्व ग्रँडमास्टर), लिओन मेन्डोन्का, श्रीश्वन मरलक्शिकारी, आदित्य मित्तल, अर्जुन कल्याण, भरत सुब्रमण्यम व राहील मुळीक (सर्व आंतरराष्ट्रीय मास्टर्स), रक्षिता रवी, वैशाली (महिला आंतरराष्ट्रीय मास्टर्स) यांचा सहभाग आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये क्रॅमनिकने फ्रान्समध्ये असेच शिबिर घेतले, त्यावेळी प्रज्ञानंदा, गुकेश, इनियन, मेन्डोंका, साधवाणी, इरिगसी यांचा त्यात सहभाग राहिला होता.