फिलीपाईन्सच्या वेटलिफ्टरची सुवर्ण जिंकल्यानंतर स्थिती, म्हणाली, आता भरपूर खाईन! खातच राहीन!
ऑलिम्पिक हा क्रीडा जगतातील सर्वोच्च क्रीडा महोत्सव. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरता आले तरी तो सन्मान असतो, यावरुन देखील बरेच काही लक्षात येईल आणि याच ऑलिम्पिकमध्ये जर अनपेक्षित सुवर्णपदकाची लॉटरी लागली तर? तर अशा आनंदाला काही पारावरच राहणार नाही. हिदिलिन डायझ ही फिलीपाईन्सची साधीसुधी वेटलिफ्टर. तिच्यासाठी देखील ऑलिम्पिक प्रतिनिधीत्व हाच सन्मान होता. पण, महिलांच्या 55 किलोग्रॅम वजनगटात तिला चक्क सुवर्ण जिंकता आले आणि या सुवर्णपदकानंतर तिला जणू आकाश ठेंगणे झाले. एका प्रतिनिधीने तिला बोलते केले त्यावेळी तिच्या तोंडून शब्दही फुटेनात आणि जेव्हा तिला विचारले गेले की, या सुवर्णपदकाचा आनंद तू कसा साजरा करशील, त्यावेळी ती चटकन बोलून गेली, मी आता भरपूर खाईन, खातच राहीन!
नंतर ती म्हणाली, ‘मुळातच, ऑलिम्पिकसाठी आम्हा ऍथलिटना बरेच त्याग करावे लागतात, जे इतरांना दिसत नाहीत. आहारावर मर्यादा येतात, काय खायचे काय नाही, याची यादी तयार होते आणि जे खायचे, ते किती प्रमाणात, ते देखील ठरवून घ्यावे लागते. वजन मर्यादेत राखण्यासाठी, तंदुरुस्तीसाठी खूप काही करावे लागते. अर्थात, येथे सुवर्ण जिंकल्यानंतर आमची मोहीम फत्ते झाली आहे. मी आता माझ्या टीम बरोबर आज भरपूर चीज केक खाईन, खातच राहीन’!
डायझने यापूर्वी 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाचा मान संपादन केला होता. त्याचवेळी तिने फिलीपाईन्ससाठी 20 वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपुष्टात आणला होता. यंदा तिने अधिक तयारीने उतरत सुवर्ण जिंकणे, हेच एकमेव लक्ष्य ठेवले आणि ते साध्यही करुन दाखवले.
टाईल्स फुटू नयेत, म्हणून….
ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून नवे प्रशिक्षक निवडल्यानंतर तिला सरावासाठी मलेशियाला जाणे भाग होते. तेही तिने केले. याचवेळी कोव्हिड-19 मुळे विविध बंधने आली आणि वर्षभरापेक्षा अधिक कालावधीत ती आपल्या कुटुंबाला भेटू देखील शकली नाही. मलेशियात एका अपार्टमेंटमध्ये अडकून पडल्यानंतर तिला तेथेच सराव करणे भाग होते. पण, वेटलिफ्टिंगमध्ये अपार्टमेंटच्या टाईल्स फ्लोअर्सना भेगा पडू नयेत, यासाठी तिला विशेष खबरदारी घ्यावी लागत असे.
पदक वितरण सोहळय़ात सॅल्यूट…
दियाझने काही काळ फिलीपाईन्स एअर फोर्समध्ये देखील सेवा बजावली असून ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकल्यानंतर तिने पदक वितरण सोहळय़ात सॅल्यूटही दिला. ‘मी आता घरी जाऊ शकेन, कुटुंबियांसमवेत या यशाचा आनंद लुटू शकेन, याचा मला खास आनंद आहे. माझ्या कुटुंबियांचा आणि मला पाठबळ देणाऱया चाहत्यांचा अभिमान आहे. त्यांचे खास आभार’, असे ती याप्रसंगी म्हणाली.