बेळगाव/ क्रीडा प्रतिनिधी
दीपक नार्वेकर पुरस्कृत बोर्ड ऑफ पॅरेन्ट्स फॉर क्रिकेट इन बेलगाम आयोजित बीपीसी लीग क्रिकेट स्पर्धेत मंगळवारच्या सामन्यात आनंद चॅलेंजर्स संघाने दैवज्ञ स्पोर्टस् क्लब संघाचा 6 गडय़ांनी तर साईराज वॉरियर्स संघाने गणेश ज्वेलर्स हुबळी टायगर्स संघाचा 3 गडय़ांनी पराभव करून विजयाची हॅट्ट्रीक केली. भेदक गोलंदाजी करणाऱया अधोक्ष मानवीला तर वैभव कुरीबागीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर आयोजित स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आनंद चॅलेंजर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. दैवज्ञ स्पोर्टस् क्लबने 25 षटकांत सर्वबाद 138 धावा केल्या. अखिलेश वेर्णेकरने 38, किशन मेघराजने चौकारांसह 18, अजय बेनकेने 16 तर तुषार चौगुलेने 13 धावा केल्या. आनंदतर्फे अधोक्ष मानवीने भेदक फिरकी गोलंदाजी करत 10 धावांत 4 गडी बाद केले. त्याला जेनित व्ही.ने 19 धावांत 2 तर राहुल बजंत्रीने 1 गडी बाद केला. त्यानंतर आनंद चॅलेंजर्स संघाने 20.1 षटकांत 4 बाद 139 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला. ज्ञानेश होनगेकरने 2 षटकार व 2 चौकारांसह 38, जेनित व्ही.ने 22, अहमद कैफ मुल्लाने नाबाद 29 तर राहुल नाईकने 17 धावा केल्या. दैवज्ञतर्फे तुषार चौगुलेने 15 धावांत 3 तर ताहा करडगीने 1 गडी बाद केला.
दुपारी खेळविण्यात आलेल्या दुसऱया सामन्यात गणेश ज्वेलर्स हुबळी टायगर्स संघाने 21.5 षटकांत सर्वबाद 123 धावा जमविल्या. अनिष भुसदने 38, सफल शेट्टीने 22, नवीन शिरगावीने 16 तर केदार उसूलकरने 15 धावा केल्या. साईराज वॉरियर्सतर्फे आकाश असलकरने 24 धावांत 3, सिद्धार्थ कदमने 29 धावांत 2 तर वैभव कुरीबागीने 13 धावांत 4 गडी बाद केले. त्यानंतर साईराज वॉरियर्स संघाने 23 षटकांत 7 गडी बाद 124 धावा केल्या. नासीरने 21, विनोद देवडीगाने 14, सिद्धांत कदमने नाबाद 14, रोहित पाटीलने 11 धावा केल्या. गणेश ज्वेलर्सतर्फे अनिश भुसदने 30 धावांत 3, आदर्श हिरेमठ व ऋषीकेश राजपूत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे मल्लिकार्जुन जगजंपी, सतीश चौगुले, संजय सातेरी अशोक पावले, मिलींद भातकांडे, आनंद करडी यांच्या हस्ते अधोक्ष मानवी आण वैभव कुरीबागी यांना सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
बुधवारचे सामने : 1) साईराज वॉरियर्स वि. विश्रृत स्टायकर्स, सकाळी 9.20 वाजता. 2) आनंद चॅलेंजर्स वि. गणेश ज्वेलर्स हुबळी टायगर्स, दुपारी 1.30 वाजता.