नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे माजी व्यवस्थापकीय संचालक आनंद सुब्रम्हण्यम याला चेन्नईतून सीबीआयने अटक केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. आनंद सुब्रम्हण्यम यांच्यावर एनएसई घोटाळय़ाशी संबंधित अनेक आरोप आहेत. सीबीआयने आनंद सुब्रम्हण्यमची तीन दिवस चौकशी केली होती. चित्रा रामकृष्ण या एप्रिल 2013 ते डिसेंबर 2016 या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या काळात त्यांनी शेअर बाजाराशी संबंधित गोपनीय माहिती हिमालयातील एका योगीला पुरवल्याचा ठपका सेबीने ठेवला होता. याप्रकरणी चित्रा रामकृष्ण यांचीही चौकशी सुरू असून आता संपुआ काळात अर्थमंत्री पदाची धुरा सांभाळणारे पी. चिदंबरम अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.